महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JAYANTI

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव (Shivaji Maharaj Jayanti) संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय. पुण्यामध्ये देखील शिवजयंतीचा अनोखा उत्साह दिसून आला.

Grand Shiv Jayanti Celebrations in Pune
पुण्यात शिवजयंती महोत्सव (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2025, 3:52 PM IST

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ५१ रणशिंगांची ललकारी, नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर, हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष, अशा पवित्र वातावरणात शिवकाळ पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.


मिरवणुकीला झाली सुरुवात: शिवजयंती महोत्सव समिती, पुणेतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणूक सोहळ्याचं उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, तसंच सर्व राजघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झालं. सर्व राजघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करत मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा मिरवणुकीचं १३ वं वर्ष आहे.

पुण्यात अवतरली शिवशाही (ETV Bharat Reporter)



शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टरमधून पुष्पवृष्टी : ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. यावेळी ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले आहेत. शिवाजी महाराज म्हटलं की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १४ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचे आणि आमच्या गायकवाड राजपरिवाराचं हे एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभार ईशानने यावेळी मानले.



सर्व जाती धर्माचे लोक एकत्र :यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांच्या ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचं स्मरण होत आहे".

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 : अद्भुत स्थापत्य, अभेद्य राज्य; छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढं शत्रू हतबल
  2. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली-पंतप्रधान मोदी
  3. राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केली पोस्ट, एका चुकीमुळे झाला वाद

ABOUT THE AUTHOR

...view details