छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -छावणी परिसरातराहणाऱ्या शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे खाली दुकान आणि वर घर होते. कपड्याचे दुकान आणि त्यात टेलरिंगचे काम केले जायचे. आग लागल्यावर धुरामुळे जीव गुदमरल्याने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मृतात हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), वसीम शेख (30 वर्ष) तन्वीर वसीम (23 वर्ष), रेश्मा शेख (22 वर्ष) आसिम वसीम शेख (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष) यांचा समवेश आहे. दुर्घटनेच्या काही तास आधी वसीम शेख याने ठेवलेले स्टेटस चर्चेत आले आहे. त्याने अल्लाहकडे साकडे घालून भयावह मृत्यू देऊ नको अशी विनंती केली होती.
स्टेटसमध्ये काय म्हटले?"हम बरी अजियत में है, दिन-ब-दिन जिंदगी हाथों से निकाली जा रही है. और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आए. हम ऐसी मौत नहीं मरना चाहते. हमें मरते ही जहन्नुम का कुर्ता पहना दिया जाए. या अल्लाह हम ऐसी मौत मरना नहीं चाहते, की कब्र में जाते ही सांप हमारे ऊपर चढ़ जाए. हम ऐसी मौत नहीं मरना चाहते, की कब्र अंधेर तरीकी में बन जाए. या अल्ला हम ऐसी मौत नही मरना चाहते, की तुम हमे हसर के दिन कहे दफा होजा!" असा मसुदा असलेला व्हिडिओ त्याने व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवला होता. विशेष म्हणजे शेख वसीम याची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
अशी घडली घटना...छावणी परिसरात जैन मंदिर परिसरात तीन मजली इमारतीत शेख कुटुंबीय पहिल्या मजल्यावर राहत होते. खाली कपड्याचे दुकान आणि टेलरिंग काम केले जायचे. तर पहिल्या मजल्यावर कुटुंबीय राहत होते. रात्री तीनच्या सुमारास अचानक दुकानात स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यानंतर आग लागली. दुकानात कपडे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं. नागरिकांनी धूर पाहताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेख कुटुंबीयांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वर जाण्यासाठी एकच जागा होती. पण, तेथून आग आणि धुरामुळे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे काही युवकांनी बाजूच्या इमारतीवरून दुर्घटनाग्रस्त इमारतीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख कुटुंबियांनी दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे त्यांना वाचवणं शक्य झालं नाही. तर दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काही भाडेकरुंना वाचवण्यात नागरिकांना यश मिळालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
आगीचे कारण अस्पष्ट-शेख कुटुंबीय कपडे शिलाई करण्याचे काम करत असायचे. रमजान महिना असल्याने ईद निमित्त अनेकांनी त्यांच्याकडे कपडे शिवण्याचे काम दिले होते. त्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत कुटुंबीय टेलरिंग काम करत होते. त्यानंतर सर्व सदस्य घरी गेल्यावर एक तासानं ही घटना घडली. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या बाहेर इलेक्ट्रिक दुचाकीचार्जिंगसाठी लावण्यात आली होती. त्याची वायर दुकानाच्या आतून काढण्यात आली होती. त्याच चार्जरचा आतमध्ये स्फोट झाला असावा. त्यामुळेच ही आग लागली असल्याचा अंदाज काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. दुकानाच्या बाहेर उभी असलेली इलेक्ट्रिक स्कुटीदेखील काही प्रमाणात जळाली आहे. आगीचं खरं कारण शोधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
लवकर मदत देण्याची केली मागणी-संपूर्ण घटनेनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दल वेळेवर पोहोचलं का? मदत वेळेवर मिळाली का याची चौकशी व्हावी, अशी खासदार इम्तियाज यांनी मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री भुमरे यांनी आचारसंहिता असली तरी घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत दिली जाईल, अशी माहिती दिली. तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून घटनेचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना लवकर मदत जाहीर करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.
हेही वाचा-