महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकी चर्चा काय? - MAHARASHTRA CANDIDATES EXPANSION

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सूचक इशारा देत आहेत. विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सुमारे अर्धा तास भेट झाली.

Chhagan Bhujbal and Devendra Fadnavis
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2024, 11:34 AM IST

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. रविवारी राज्यातील ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी भुजबळांच्या समर्थनासाठी बैठक घेऊन ओबीसी समाज पूर्णतः भुजबळांच्या मागे ठामपणे उभा राहील, याची ग्वाही दिली. त्यानंतर बोलताना छगन भुजबळ यांनी आपला निर्णय अद्याप झालेला नाही, आपल्याला निर्णय घेण्यासाठी काही वेळ लागेल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर नाराज छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सूचक इशारा देत आहेत. विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सुमारे अर्धा तास भेट झाली.

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावललं :भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का, याची चर्चा आता सुरू झालीय. भुजबळांनी त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पवार, पटेल आणि तटकरे हे तिन्ही नेते मिळून पक्षाचे विविध निर्णय घेतात, त्यामध्ये आपला काही सहभाग नसतो, असेही भुजबळ म्हणाले होते. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी नेते म्हणून भुजबळ यांनी दंड थोपटले होते. ओबीसी आरक्षणाची पाठराखण केली म्हणून हा निर्णय झाला का, असा संशयदेखील ओबीसी नेत्यांनी व्यक्त केल्याचं भुजबळ म्हणाले होते.

भुजबळांच्या हितचिंतकांचा भाजपामध्ये जाण्याचा आग्रह :भुजबळांचा गेल्या काही दिवसांतील रोख पाहता भाजपाशी त्यांची सलगी वाढण्याची शक्यता दिसून येतेय. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात सूचना केली होती, मात्र राष्ट्रवादीकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही, अशा आशयाचे वक्तव्य देखील भुजबळांनी केले होते. नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळांच्या हितचिंतकांनी भाजपामध्ये जाण्याबाबत मत व्यक्त केले होते. भुजबळ समर्थकांचा देखील राष्ट्रवादी सोडण्याचा आणि सत्तेत राहण्याचा कल आहे. भुजबळ हे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेते असल्याने त्यांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर भाजपाला त्यांचा मोठा लाभ होऊ शकतो. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावण्यास भाजपा नेते तयार आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांना राज्यसभेवर जाण्याचे किंवा राज्यपालपद स्वीकारण्याचे पर्याय सुचवले होते, मात्र भुजबळांकडून त्याला नकार देण्यात आला, असे सांगण्यात येतेय. भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि त्याच्यातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


हेही वाचा

  1. "भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तर महायुतीविरोधात...", ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा
  2. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर; एसटी प्रशासनाला दिला महिन्याभराचा अल्टीमेटम

ABOUT THE AUTHOR

...view details