पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर अनेक दिवसांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळलं. मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. यावर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम : महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना याबाबत छगन भुजबळ म्हणाले, "मी काही निर्णय घेतला असेल तुम्हाला का सांगेन, मी नाराज आहे हे रोज तुमच्यासमोर ओरडून सांगू का? परवा रात्री मी आलो आहे आणि फुले यांच्या कार्यक्रमात बिझी आहे. मला काही घाई नाही मला जो निर्णय घ्यायचा तो मी घेतला आहे. योग्य वेळेला मी तो सांगेन". तर नायगाव येथे मोठ्या प्रमाणावर आज कार्यक्रम झाले, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.