महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुंबईच्या गॅस चेंबर'मध्ये त्यांनी फुलवली परसबाग, भेटा मुंबईच्या नर्सरी मॅनला - PARASBAG

शहरात शेतीची जागा आता सिमेंटचं जंगल घेत आहे. शेत जमिनींमध्ये आता टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळं चेतन सुरेनजी यांनी परसबाग फुलवली आहे.

Parasbag In chamber
परसबाग (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

मुंबई : मुंबईत प्रदूषण वाढलं आहे अशी तक्रार सर्वच करतात. मात्र, हे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण स्वतःहून काही प्रयत्न करतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आज मुंबईतील वनसंपदा कमी होत चालली आहे. हे या प्रदूषणाचं मुख्य कारण आहे. मात्र, असे कितीजण आहेत की जे आपल्या घराभोवती, इमारतीभोवती झाडे लावतात? मुंबईत आज बघावं तिकडं इमारतींची कामं सुरू आहेत. यालाच आपण मुंबईत इमारतींचं जंगल उभं राहात आहे असं म्हणतो. अशातच मुंबईच्या चेंबूर विभागाला मुंबईचा गॅस चेंबर म्हटलं जातं. अशा या 'मुंबईच्या गॅस चेंबरमध्ये' एका माणसाने चक्क मिनी कोकण फुलवलं आहे.


परसबाग फुलवली: मुंबईच्या चेतन सुरेनजी यांनी आपल्या 500 चौरस मीटरचा छोट्याशा जागेत एक छोटी 'परसबाग' फुलवली आहे. चेतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या परसबागेची सुरुवात एका समस्येतून झाली. त्याचं झालं असं की, उन्हाळ्याच्या दिवसात चेतन यांच्या घराचा टेरेस खूप जास्त हीट व्हायचा. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून, चेतन यांना एका मित्राने फॅशन फ्रूट ज्याला मराठीत कृष्ण फळ म्हणतात त्याचं छोटं रोप दिलं होतं. हे रोप त्यांनी आपल्या गच्चीवर लावलं होतं. पुढच्या काही महिन्यात या रोपाची वेल खूप मोठी वाढली आणि गच्चीवर नैसर्गिक सावली तयार झाली. यामुळं त्यांच्या घरात नैसर्गिक गारवा निर्माण होऊ लागला, परिणामी वीज बिल कमी येऊ लागलं."

प्रतिक्रिया देताना चेतन सुरेनजी (ETV Bharat Reporter)

बांबूची केली लागवड :चेतन पुढे सांगतात, "जेव्हा माझ्या लक्षात आलं आपलं लाईट बिल कमी येत आहे. त्यावेळी, यावर मी आणखी काम करण्यास सुरुवात केली. आणखी काही वेली मी घराबाजूला लावल्या. त्याचा परिणाम असा झाला की, विविध प्रकारची फुलपाखरं, विविध प्रकारचे पक्षी माझ्या घराच्या परिसरात येऊ लागले. धुळीपासून आणि वायू प्रदूषणापासून घराचं संरक्षण झालं. यासाठी चेतन यांनी आपल्या घरासमोर बांबूचे विविध प्रकार लावले आहेत. बांबूमुळं धूळ तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही. बांबूमध्ये आवाज शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळं बाहेर कितीही जास्त गोंगाट असला तरी त्याचा परिणाम घरात जाणवत नाही. बांबू हे धुळीचं फिल्टरेशन करण्याचं काम करतं."


बागेत पक्षांची संख्या वाढली : कृष्ण कमळ फुलामुळं त्यांच्या बागेत फुलपाखरे आणि मधमाशांची संख्या इतकी वाढली की संपूर्ण बागेत नैसर्गिक परागीकरण होत आहे. याच मधमाशांच्या आधारे चेतन आपल्या घरात मधमाशी पालन देखील करतात. आज घडीला चेतन यांनी आपल्या परसबागेत चाळीसहून अधिक प्रकारची झाडं लावली आहेत. या परसबागेमुळं वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून चेतन यांचं घर दूर आहे.



बोरिंगचं पाणी वाढलं: इतक्यावर न थांबता चेतन यांनी पाणी पातळीत वाढ व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात चेतन यांच्या बोरिंगमधील पाणी आटायचे. त्यांच्यासमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण व्हायची. चेतन यांनी भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केलं असून, पावसाचं पाणी आणि घरातील पाणी ते पुन्हा जमिनीमध्ये सोडतात. त्यासाठी त्यांनी विविध खड्डे तयार केले आहेत. या खड्ड्यांद्वारे हे पाणी फिल्टर होऊन पुन्हा नैसर्गिक स्त्रोतांमध्ये मिसळतं. याचा परिणाम म्हणजे चेतन यांच्या बोरिंगचं पाणी वाढलं असून, त्याचा फायदा त्यांच्या आसपासच्या घरांना देखील झाला.

हेही वाचा -

  1. मुलांच्या पुरेशा झोपेसाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, राज्यपालांची सूचना, शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
  2. परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट; संचारबंदीत महिला मजुरांनाही मिळाले काम
  3. विद्यार्थ्यांना भाज्यांची माहिती देणारी सेंद्रीय परसबाग

ABOUT THE AUTHOR

...view details