मुंबई CA Bakul Modi on Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असला तरी महाराष्ट्र व मुंबईच्या वाट्याला काहीच आल्याचं दिसत नाही. तर दुसरीकडे ज्यांच्या पाठींब्यावर मोदी सरकार उभे आहे त्या नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या राज्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात चार्टर्ड अकाउंटंट बकुल मोदी यांनी सविस्तर बातचीत केली आहे.
काय म्हणाले बकुल मोदी? : अर्थसंकल्पावर बोलताना बकुल मोदी म्हणाले, "एकंदरीत बघितलं तर हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तराचा विचार करण्यात आला आहे. 2047 च्या विकसित भारताकडे लक्ष ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अनेक योजनांचा पाऊस या अर्थसंकल्पात पाडण्यात आला असला तरी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचतात का? हे पाहणं फार महत्त्वाचं आहे." त्याचप्रमाणे युवक व महिलांना या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आल्याचं बकुल मोदी म्हणाले. तसंच युवकांसाठी रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासोबतच 500 नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप सुविधा करुन देण्यात आली आहे. कर प्रणालीमध्ये सुद्धा बदल करण्यात आल्यानं त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना नक्कीच होणार असल्याचंही मोदी म्हणाले.