मुंबई Chandrahar Patil : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील तीन ते चार महिने विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. तसेच जागा वाटपाचे समीकरण आणि विजयाचे गणित मांडले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरू आहे. याच धरतीवर शिवसेना (ठाकरे गटाचे) लोकसभेतील पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.
तर आपण विचार करू :आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा सर्व राज्यात साजरी केली जात असताना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मुंबईत येत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला; मात्र जर पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची जबाबदारी दिली तर त्याबाबत आपण नक्कीच विचार करू, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? चंद्रहार पाटील यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.