मुंबई -मुंबईतील झगमगाटामुळे शहराला मायानगरी म्हणतात. इथे स्वप्न घेऊन येणारे अनेक जण असून, स्वप्न उराशी बाळगून ते आपलं घर सोडून मुंबई गाठतात. मात्र, यातील सर्वच जण 'सुजाण' असतात असं नाही. यात काही अल्पवयीन मुलं-मुली देखील असतात. आता सोशल मीडियामुळे तर मुंबईतील धामधूम, झगमगाट, मुंबईची लाईफस्टाईल या अल्पवयीन तरुण-तरुणींना आकर्षित करताना दिसते. त्यामुळे ही मुलं थेट मुंबई गाठतात आणि या मुलांच्या घरी शोधाशोध सुरू होते. तुम्हाला वाटेल यात बातमी सारखं काय आहे? तर मुंबईच्या या उच्चभ्रू लाइफस्टाइलची भुरळ पडून घर सोडून मुंबईत येणाऱ्या अल्पवयीन मुला मुलींची संख्या कमी नाही. मध्य रेल्वेने एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या 8 महिन्यांत तब्बल 1064 मुला-मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलंय.
आरपीएफच्या विशेष मोहिमेला एक नाव :घर सोडून आलेल्या या अल्पवयीन मुला-मुलींना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचे काम रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफ करीत आहे. आरपीएफच्या या विशेष मोहिमेला एक नावदेखील देण्यात आलंय. मध्य रेल्वेने या विशेष मोहिमेला 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असं साजेस नाव दिलंय. रेल्वेच्या या ऑपरेशनने फरिश्ते मोहिमेंतर्गत मागील केवळ आठ महिन्यांच्या काळात घर सोडून आलेल्या 1,064 मुलांची सुखरूप सुटका केली असून, या मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटलंय. यातील महत्त्वाची बाब म्हणजे यात सर्वाधिक मुला-मुलींची संख्या ही उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांतील मुलांची आहे.
मध्य रेल्वेकडून एकूण 1,064 मुलांची सुटका : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2024 दरम्यान मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने एकूण 1,064 मुलांची सुटका केली असून, सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये 740 मुले आणि 359 मुलींचा समावेश आहे. ही मुलं महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांवर भटकताना, भीक मागताना किंवा बालमजुरी करताना आरपीएफ जवानांना आढळलीत. यात मुंबई विभागात 312, भुसावळ विभागात 313, पुणे विभागात 210, नागपूर विभागात 154 तर, सोलापूर विभागात 75 मुलं आरपीएफ जवानांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलीत.
उजव्या हातावर मोबाईल नंबर गोंदलेला :मध्य रेल्वे अलीकडचे एक घटना सांगितली असून, ही घटना खांडवा रेल्वे स्थानकावर घडलेली आहे. आरपीएफ कर्मचारी ईश्वर चंद जाट आणि आर. के. त्रिपाठी या दोन जवानांची 7 नोव्हेंबर 2024 रोजी खांडवा रेल्वे स्थानकावर ड्युटी होती. या दोन जवानांना रेल्वे स्थानकावर पेट्रोलिंग करताना फलाट क्रमांक 4 आणि 5 वर एक अल्पवयीन मुलगा शांतपणे बसलेला दिसला. या दोन्ही जवानांनी त्या मुलाजवळ जाऊन त्याची चौकशी केली. त्याचं नाव विचारलं. त्या मुलाने आपलं नाव सुमित असं सांगितलं. जवानांनी तात्काळ त्याला आपल्या कार्यालयात नेलं आणि त्याचं समुपदेशन केलं. समुपदेशन करतेवेळी या मुलाच्या उजव्या हातावर मोबाईल नंबर गोंदलेला आढळला. या दोन जवानांनी तात्काळ त्या मोबाईल नंबरवर फोन केलाय. त्यावेळी हा मोबाईल नंबर त्या मुलाच्या मोठ्या भावाचा असल्याचं आढळून आलंय. आरपीएफ जवानांना सापडलेल्या स्मृतिभ्रंश असल्याचे त्यांच्या मोठ्या भावाने सांगितलं. त्यानंतर या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि या मुलाला त्याचा भाऊ न्यायला येईपर्यंत नवजीवन बालगृहात ठेवण्यात आलंय.
मे महिन्यात एकूण 93 मुलं पालकांच्या स्वाधीन : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात एकूण 56 बालकांची सुटका करण्यात आली असून, यात 29 मुलं तर 27 मुली आहेत. मे महिन्यात एकूण 93 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं असून, यात 61 मुले आणि 32 मुली आहेत. जून महिन्यात एकूण 95 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, यात 55 मुले आणि 40 मुली आहेत. जुलै महिन्यात 202 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल असून, यात 137 मुलं तर 65 मुली आहेत. ऑगस्ट महिन्यात एकूण 141 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं असून, यात 94 मुले तर 44 मुली आहेत. सप्टेंबर महिन्यात एकूण 160 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, यात 125 मुले तर 35 मुली आहेत. ऑक्टोबर महिन्यात एकूण 114 बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, यात 85 मुले तर 29 मुली आहेत.
आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल पालकांकडून कृतज्ञता व्यक्त :याबाबत रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, घरात भांडण झाल्याने किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन या शहराचे ग्लॅमर इत्यादी कारणांमुळे ही मुलं आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येतात. ही मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात, तेव्हा हे प्रशिक्षित रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करतात. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या सेवेबद्दल अनेक पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी येत असतात. ही मुलंदेखील याचाच एक भाग आहेत. मात्र, काही मुलं आपल्या पालकांशी भांडण झाल्याने घर सोडून मुंबईत येतात. तर, काहींना फसवूनदेखील मुंबईत आणलं जातं. ही मुलं या मायानगरीत आपलं बालपण हरवून बसतात. तर काही मुलं चुकीच्या संगतीत आल्याने वाईट मार्गाला लागतात किंवा काही वेळा वाईट मार्गाला लावली जातात. मात्र, ज्या तरुण पिढीला आपण देशाचे भविष्य म्हणतो हे तरुण पिढी पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवर यावे, यासाठी रेल्वेची नन्हे फरिश्ते ही मोहीम फायदेशीर ठरताना दिसतेय.
हेही वाचा :
- घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश
- शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट आव्हाड यांनी केली, धनंजय मुंडे यांचा आरोप