पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण मंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या कॉपी विरोधी कायदानुसार विद्यार्थी गैरमार्गानं पेपर लिहिताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
...तर गुन्हा दाखल करणार :याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, "हा निर्णय जुना असून शासनाच्या 1982 च्या कॉपीविरुद्ध कायद्यानुसार जो विद्यार्थी गैरमार्गानं पेपर लिहीत असेल किंवा त्याच्याकडं तसं एखादं साहित्य आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. यावर्षी देखील या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कॉपीला प्रेरणा देणारे तसंच प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे."