पुणेPune Hit And Run Case :पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन येथे प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, जयेश बोनकर आणि विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 19 मे रोजी रात्री 02.30 वा. च्या सुमारास कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवरील लॅंडमार्क सोसायटीजवळ एका मुलाने त्याच्या ताब्यातील ग्रे रंगाची दोन्ही बाजुला नंबर प्लेट नसलेली पोर्श कार बेदरकारपणे चालवून त्याने पल्सर गाडी क्र. MH14CQ3622 या मोटारसायकलला धडक देऊन अपघात केला. त्याबाबत येरवडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पोर्श कार चालक याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अल्पवयीन तरुण त्याच्या मित्रांसोबत विमाननगर येथे रात्री 10 ते 12 च्या दरम्यान एबीसी रोड, मुंढवा येथील कोझी या हॉटेलमध्ये 18 मे रोजी पार्टी करायला गेला होता.
त्या मुलाकडे कार चालवण्याचा परवाना नाही :याबाबत हॉटेलचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन अशोक काटकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आला असता त्याने नॉन व्हेज जेवण व मद्य ऑर्डर केले होते, असे कळले. तसेच त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा रात्री 12.00 ते 01.00 वा.च्या दरम्यान त्याच्या मित्रांसोबत हॉटेल ब्लेंक, मुंढवा येथे मद्य पिण्याकरीता गेला असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत हॉटेलचे मॅनेजर संदिप रमेश सांगळे आणि बार काऊंटर जयेश सतीश बोनकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा अल्पवयीन तरुण त्याच्या मित्रासोबत आला असताना त्याच्या मागणीप्रमाणे वयाची खात्री न करता मद्य दिले असल्याचे सांगितले. तसेच त्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली असता त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श ही चारचाकी कारही मुलाला कार चालवण्याचे प्रशिक्षण झाले नसताना व त्याचेकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना त्यास कार चालवण्याकरिता दिल्याचे समजले.
या कलमांतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल:हे कृत्य हे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75, 77 प्रमाणे आणि मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3, 5, 199 (अ) प्रमाणे गुन्हा होत असल्याने हॉटेल कोझिचे मालक प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मॅनेजर संदिप सांगळे व बार काउंटर जयेश बोनकर व त्या तरुणाचे वडील विशाल अग्रवाल यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले सीपी ? :याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. तसेच मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टसोबत काम करण्यात येईल. यात कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला असून या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातुन समजेल. या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा मुलगा खरचं अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. पण, हा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट होत आहे.