महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅरम! शासनाचा एक दुर्लक्षित खेळ; कॅरमचा जगज्जेता अद्यापही नोकरीपासून वंचित - SANDIP DIVE

मुलांच्या शिक्षणाचा आणि घर खर्च हे सर्व आज पत्नी पूर्ण करीत आहे. त्याचं कारण म्हणजे मला नोकरी नाही," अशी कैफियत संदीप दिवेंनी मांडलीय.

Carrom neglected game
कॅरम दुर्लक्षित खेळ (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 3 hours ago

मुंबई -लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना कॅरम बोर्ड खेळण्यास आवडते. कॅरम खेळूनही अनेकांनी देशविदेशातही ख्याती मिळवलीय. आता अशाच एका कॅरम खेळणाऱ्या खेळाडूला दुर्लक्षित ठेवल्याचं समोर आलंय. "मी बदलापूर येथे एका भाड्याच्या घरात राहतो. माझी पत्नी नोकरी करते. तिच्या जिवावरच घर चालतं. मी माझ्या घरी कॅरमचे क्लासेस घेतो. त्यातून थोडेफार उत्पन्न मिळतं. तोच काय तो माझा माझ्या पत्नीला हातभार आहे. माझी आजची परिस्थिती खूप वाईट आहे. मुलांच्या शिक्षणाचा आणि घर खर्च हे सर्व आज पत्नी पूर्ण करीत आहे. त्याचं कारण म्हणजे मला नोकरी नाही," अशी कैफियत संदीप दिवेंनी मांडलीय. 2022 मध्ये मलेशिया येथे झालेल्या जागतिक कॅरम चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावणाऱ्या संदीप दिवेंची परिस्थिती सध्या हलाखीची आहे.

कॅरम एक दुर्लक्षित खेळ :खरं तर आज 'कॅरम... शासनाचा एक दुर्लक्षित खेळ असं म्हणण्याची वेळ आलीय. सध्या सर्वत्र क्रिकेट, बुद्धिबळ याच खेळांच्या चर्चा सुरू आहेत. विश्वविजेत्या क्रिकेटपटूंवर बुद्धिबळ चॅम्पियनवर करोडोंच्या बक्षिसांचा वर्षाव शासनाकडून केला जातोय. तुम्ही 10 क्रिकेटपटूंची नावे पटापट सांगाल, पण केवळ 5 विश्वविजेत्या कॅरमपटूंची नावे सांगता येणार नाहीत. हे सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राला कॅरमची पंढरी म्हटले जाते. 2022 मध्ये मलेशिया येथे कॅरमची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यात भारताच्या संदीप दिवे या तरुणाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. मात्र, आज हाच वर्ल्ड चॅम्पियन बेरोजगारीशी झुंज देतोय.

आज मला नोकरी नाही : ईटीव्ही भारतशी बोलताना संदीप दिवे यांनी सांगितलं की, "जागतिक कॅरम चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होऊनदेखील आज मला नोकरी नाही. मला सरकारने कोणतीही मदत केली नाही. आज मुलांचं शिक्षण, घरभाडे, वीजबिलासह इतर खर्च हे सर्व एकत्र केलं तरी साधारण 30 ते 35 हजारांपर्यंत महिन्याचा खर्च जातो. आज माझं घर माझ्या पत्नीचा पगार आणि मी जे कॅरम क्लास घेतो, त्याच्या जोरावर चालत आहे. कधी कधी ज्या काही इथे कॅरम स्पर्धा होतात, त्यामध्ये मी सहभागी होतो. त्यातून जी बक्षिसाची रक्कम मिळते, त्यातून घर चालवण्यासाठी थोडासा हातभार लागतो. माझी एकच इच्छा आहे की, इतर खेळाडू ज्याप्रमाणे देशासाठी खेळतात, त्याप्रमाणे मीदेखील देशासाठी खेळलो. त्यामुळे सरकारनेदेखील माझ्या कामगिरीची दखल घेऊन योग्य तो सन्मान करावा." विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणावर मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. "मी त्यांना भेटायला तयार आहे. ते जर मला भेटले तर मी त्यांना नक्की मदत करेल," असंही किसन कथोरेंनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

शासनासाठी एक दुर्लक्षित खेळ (Source- ETV Bharat)

सरकारकडून मदत करण्यास नकार :यासंदर्भात आम्ही दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अरुण केदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "संदीप यांच्या विजयानंतर सरकारने त्यांना मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण सरकारने मदत करण्यास नकार दिलाय. कॅरमचा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश नसल्याने आम्ही मदत करू शकत नसल्याचं सरकारने आम्हाला उत्तर दिलं. आज ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा समावेश नाही, असे अनेक खेळ आहेत. त्या खेळाडूंचा सरकारकडून सन्मान केला जातो. मात्र, जे कॅरमचे खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून येतात, त्यांचा सरकार सन्मान करीत नाही ही शोकांतिका आहे. कॅरम हा सांघिक खेळ नाही. तो एक वैयक्तिक खेळ असल्याचं सरकारने आम्हाला उत्तर दिलं," अशी प्रतिक्रिया अरुण केदार यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदेंची नवीन ओळख 'लाडका भाऊ' कशामुळं? 'ही' योजना ठरली गेमचेंजर
  2. लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदेंचं लक्ष्य पालिका निवडणुकीवर, विजयाची रणनीती काय?
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details