सोलापूर Cannabis Seized in Solapur : राज्यात एकीकडे एमडी ड्रग्जच्या कारवाया होत असताना दुसरीकडं सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजाविरोधात मोठी कारवाई केलीय. सोलापूर पुणे महामार्गावर झालेल्या दोन कारवायांमध्ये सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेनं सहा संशयित आरोपीना अटक केलीय, तर तीन संशयित अजूनही फरार आहेत. या संशयित आरोपींकडून तब्बल 459 किलो गांजा जप्त केलाय. सोलापूर तालुका आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे 1 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सोलापुरच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जातंय.
सोलापूर पुणे महामार्गावर सापळा रचून कारवाई : सोलापूर तालुका हद्दीतून एका चार चाकी वाहनांतून दोन व्यक्ती आंध्रप्रदेशमधून गांजा घेऊन बारामतीकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी गावाजवळ सापळा रचला. यात त्यांनी एका संशयित वाहनाला अडवून त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता, त्यात 459 किलो 340 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी अल्ताफ युनुस इनामदार, जमीर इब्राहिम शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 46 हजार 900 रुपयांचा अवैध गांजा जप्त करण्यात आलाय.