मुंबई Chief Election Commissioner Rajiv kumar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणार असल्याची माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील दोन दिवसांच्या आढावा दौऱ्यानंतर ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची नावे आणि कारणं पक्षांना जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ती माहिती उमेदवारांनीसुद्धा जाहीर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील 11 राजकीय पक्षांच्या भेटी :राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले दोन दिवस महाराष्ट्राचा आढावा दौरा केला. या आढाव्यादरम्यान आपण राज्यातील 11 राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या असून, या राजकीय पक्षांनी आपल्याकडे विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांकडून खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तसेच काही वस्तूंचे दर कमी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. मात्र, खर्चाची मर्यादा ही देशपातळीवर एकच ठरवण्यात आलेली असते. तसेच वस्तूंचे दरही महागाई निर्देशांकानुसारच ठरवलेले असतात. त्यामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
गैरप्रकारांना रोखण्याच्या सूचना : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीतील आचारसंहिता कालावधीत राज्याच्या सीमा भागांवर असलेल्या 321 चेकनाक्यांवर बारीक लक्ष ठेवणार आहे. हवाई मार्गे, रस्ता मार्गे आणि रेल्वे मार्गे कोणत्याही पद्धतीची दारू अमली पदार्थ आणि पैशाची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. मात्र या कालावधीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कडक धोरण : तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या गृह जिल्ह्यातून बदली करण्यात यावी. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणावी, कोणालाही कोणत्याही पद्धतीची मर्जीतली बदली देण्यात येऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असणार आहे. याबाबत अत्यंत कठोरपणे कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही राजकीय पक्षांनी पोलीस महासंचालकांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करत केलेल्या बदलीच्या चौकशीबाबत केलेल्या मागणीवर उत्तर देण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी टाळले.
न्यायप्रविष्ट बाबीवर बोलण्यास नकार: विशेष म्हणजे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरून न्यायालयात सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने समान दिसणारी चिन्हे देऊ नयेत, ही मागणी नोंदवण्यात आली असून, त्याप्रमाणे चिन्ह वाटपात योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.