मुंबई Call Centre Fraud : कोणताही वैध परवाना नसताना लाओसच्या गोल्डन ट्रँगल एसईझेड इथं चांगल्या पगाराचं आमिष दाखवून मुंबईसह देशभरातील विविध बेरोजगार तरुणांना बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये नोकरी दिली जाते. या अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून क्रिस्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केलाय. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली आहे. ठाण्यात राहणाऱ्या तक्रारदार पीडित व्यक्तीनं विले पार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं या रॅकेटचा भांडाफोड झाला.
चार महिने बोगस कॉल सेंटरमध्ये काम : तक्रारदार सिद्धार्थ चंद्रशेखर यादव हा ठाण्यातील वागले इस्टेट परिसरात राहतो. रोहित नावाच्या व्यक्तीनं सिद्धार्थला डिसेंबर 2022 मध्ये विदेशातील नोकरीबाबत माहिती दिली. जेरी जेकब हा विदेशात कमिशनवर नोकरी मिळवून देतो, अशी माहिती मिळाल्यानंतर सिद्धार्थने जेरी जेकबकडे चौकशी केली. विदेशात नोकरी केल्यास सुरुवातीला 65 हजार आणि इन्सेंटिव्ह्स मिळतात, असं सांगण्यात आलं. त्यानुसार या पगाराला भुलून सिद्धार्थ डिसेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत लाओस इथं बोगस कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याला मासिक 65 हजार रुपये आणि इन्सेन्टिव्ह मिळत होता, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी दिली.
सोशल मीडियावर फेक आयडी बनवून लोकांना गंडा : मुंबई बँकॉंक आणि बँकॉंक मुंबई अशा दोन विमानानं ठरल्याप्रमाणे 30 डिसेंबर 2022 रोजी सिद्धार्थ बँकॉंकला गेला होता. तिथं त्याची पुण्यातील एका तरुणीसह दिल्ली आणि पंजाबहून आलेल्या पाच तरुणांशी ओळख झाली. या तरुणांना तिथं नोकरीसाठी आणण्यात आलं होतं. तिसर्या दिवशी प्रत्येकाला दोन आयफोन, दोन लोकल आणि एक युएसएचे असे तीन सिमकार्ड देऊन या तरुणांना त्यांच्या नावानं फेसबुक, इंटाग्राम आणि टिकटॉकवर फेक आयडी बनविण्यास सांगण्यात आलं.