अमरावती :पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आशिया खंडातील सर्वात सुपीक जमीन पिंपळगाव राजा परगण्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव परिसरात आहे. मुघलांना या भागातून सर्वाधिक महसूल मिळत असे. महसुलीचं मुख्य केंद्र असणाऱ्या या भागात पुढे नागपूरकर भोसल्यांनी पिंपळगाव राजा पासून काही अंतरावर तत्कालीन गोंधन खेड आणि आजच्या गोंधनापूर येथे गढीच्या ठिकाणी किल्ला बांधला. नागपूरकर भोसलेंचा कोषागार असणारा हा किल्ला कायम युद्धासाठी सज्ज होता. किल्ल्याच्या चारही बुरुजांवर सज्ज असणाऱ्या तोफा शत्रूंची वाट पाहत होत्या. सारा वसुलीचं महत्त्वाचं केंद्र असणाऱ्या या किल्ल्यावर मात्र शत्रूंनी कधीच आक्रमण केलं नाही. गोंधनापूर येथील (Gondhanapur Fort) या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यासंदर्भात "ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.
किल्ल्याचा असा आहे इतिहास :खामगाव शहरापासून काही अंतरावर पिंपळगाव राजा या ठिकाणी मुघल सम्राट अकबरानं 1555 मध्ये किल्ला उभारला. या भागातून मुघल त्यावेळी चार कोटी रुपयांचा महसूल मिळवत असत. मोठा काळ हा परिसर मुघलांच्या ताब्यात होता. पुढे नागपूरकर भोसल्यांची सत्ता या परिसरात आली आणि पिंपळगाव राजा लगतच त्याकाळी असणाऱ्या गोंधन खेड आणि आजच्या गोंधनापूर या ठिकाणी 1791 मध्ये गडीच्या ठिकाणी किल्ला उभारण्यात आला. 1795 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर या किल्ल्यावर पहिले किल्लेदार म्हणून मुरडाजी पाटील वानखडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती इतिहासाचे प्रा. डॉ. किशोर वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
नागपूरकर भोसल्यांचं महत्त्वाचं कोषागार : पिंपळगाव राजासह लगतच्या मोठ्या सुपीक प्रदेशातून जमा होणारा महसूल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं कोषागार म्हणून गोंधनापूरचा किल्ला हे नागपूरकर भोसलेंचं महत्त्वाचं ठिकाण होतं. या किल्ल्यावर जमा होणारा महसूल पुढे बाळापूर येथील किल्ल्यावरून नरनाळा आणि गाविलगड किल्ल्यावर पोहोचायचा. या चारही महत्त्वाच्या ठिकाणावरील सर्व महसूल गाविलगडावरून पुढे नागपूरला जात अशी माहितीदेखील प्रा. डॉ. किशोर वानखेडे यांनी सांगितलं.
किल्ल्याचं असं आहे वैशिष्ट्य : गोंधनापूर येथील किल्ल्यावर एकूण 52 खोल्या आजही शाबूत आहेत. यापैकी काही खोल्यांमध्ये आजही जाता येतं. इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावर देखील बारा महाल आणि अठरा कारखाने बांधले होते. त्यांचे अवशेष आज देखील या किल्ल्यावर शाबूत आहेत. धान्य कोठार, रत्नशाळा, शस्त्रागार या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं किल्ला पाहताना लक्षात येतं. या ठिकाणी परिसरातील गावातील दागिन्यांची व्यापारी दागिने विकण्यासाठी येत.