मुंबई Builder Threatened : अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कारवाईचा धाक दाखवत बिल्डरकडून 164 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 120 ब, 387 आणि 506(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी रविवारी (21 जानेवारी) चौघांना तर सोमवारी (22 जानेवारी) एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने अटक केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज (23 जानेवारी) न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
पाच जणांना अटक : 'ओमकार रियल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स'चे मालक ताराचंद मूलचंद वर्मा यांच्याकडून 164 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 9 ने पाच जणांना अटक केली. अविनाश शशिकांत दुबे (वय 46), राजेंद्र भीमराव शिरसाठ (वय 59), राकेश आनंदकुमार केडिया (वय 50), कल्पेश बाजीराव भोसले (वय 50), अमेय सावेकर (वय 38 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण :काही दिवसांपूर्वी ताराचंद वर्मा यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 6 जानेवारीला एका आरोपीनं त्यांना फोन केला होता. त्यानंतर 10 जानेवारीला वांद्रे येथील एका कॉफी शॉपमध्ये बैठक झाली. त्याचवेळी, एका आरोपीनं ताराचंद वर्मा यांना ईडीचा अधिकारी असल्याचा खोटा दावा केला. तसंच बिल्डर सतीश धानुकासोबत झालेल्या व्यवहाराबाबत 164 कोटी रुपयांच्या तडजोडीची धमकी दिली. ताराचंद वर्मा यांना खंडणीची रक्कम द्यायची नसल्यानं त्यांनी राज्याच्या गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले :ताराचंद वर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बैठक झालेल्या कॉफी शॉपमधील सीसीटीव्हीफुटेज तपासण्यात आले. यामध्ये ताराचंद वर्मा यांना 5 जण धमकावत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवत रविवारी चौघांना तर सोमवारी एकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं. तर गुन्हे शाखा बांधकाम व्यवसायिकाच्या सहभागाबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून चौकशी, कथित 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप
- Supreme Court On ED : 'ईडीनं सूड भावनेनं काम करू नये ...
- खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या सूरज चव्हाण यांना ...