नागपूरMayawati Nagpur Meeting:आज नागपूरच्या बेझनबाग मैदानावर पार पडलेल्या सभेत मायावतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं आवाहन नागपूरच्या मतदारांना केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील एकूण लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. या पाचही ठिकाणी भारतीय समाज पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत. उमेदवारांच्या प्रचाराकरिता आज बसपा प्रमुख मायावतीच्या नागपुरात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही :देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेस पक्षानेचं उपभोगली; मात्र देशाचा विकास त्यांनी केला नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला पुढे यावं लागलं होतं असं मायावती म्हणाल्यात. काँग्रेसने बाबासाहेबांना जिवंतपणी भारतरत्न दिले नाही, असा आरोप मायावती यांनी केला. बाबासाहेबांच्या प्रयत्नाने मंडळ आयोगाच्या शिफारसीनुसार या देशातील मागासवर्गीयांना आरक्षण मिळायला हवं होतं. पण ते देखील काँग्रेसने होऊ दिलं नसल्याचा आरोप मायावतींनी केलाय.
बसपामुळे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले :ज्यावेळी देशात व्हीपी सिंग सरकार अस्तित्वात येत होतं, त्यावेळी बसपापकडून दोन अटी पुढे ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील पहिली अट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात यावे आणि दुसरी म्हणजे मंडळ आयोग लागू करावा. बसपामुळे देशात मंडळ आयोग लागू झाले आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचं मायावती म्हणाल्या आहेत.
जुमलेबाजी कामात येणार नाही :या निवडणुकीत जुमलेबाजी अजिबात कामात येणार नाही. सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप मायावती यांनी केलाय. केंद्र सरकार केवळ मोठ्या धनदांड्यांसह उद्योगपतींना सूट देण्यातच मग्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमच्या पक्षानं धनदांडगे आणि उद्योगपतींकडून पैसे घेतले नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.