पुणे Brother Killing Sister Pune :नात्यापुढं पैसा. प्रॉपर्टीला किंमत नाही असं आपण म्हणतो. मात्र, पुण्यात अशी एक घटना घडली ज्यात पैसा, प्रॉपर्टीच सर्वकाही असल्याचं दिसून आलं. राहत्या घराच्या मालकीवरुन वारंवार वाद व्हायचे. याचा राग मनात धरुन पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका सख्ख्या भावानं आणि त्याच्या पत्नीनं 48 वर्षीय बहिणीला मारून तिचे तुकडे-तुकडे करून नदी पात्रात फेकून दिले. ही घटना पुणे पोलिसांनी उघडकीस आणली.
बहीणीची केली हत्या :बहीण-भावाचं नातं वेगवेगळ्या रुपानं आपण अनुभवतो. भाऊ बहिणीसाठी कधी हळवा होतो, तर कधी खंबीर होत तिची साथ देतो. पण, पुण्यात एका भावानं केवळ घराच्या मालकीच्या वादातून आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या करुन तिचे तुकडे करुन नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली. याबाबत चंदननगर पोलिसांनी मृत महिलेचा भाऊ अश्पाक अब्दुल खान (वय- ५१ वर्षे, रा.शिवाजीनगर) तसंच त्याची पत्नी हमीदा अश्पाक खान ( वय- ४५ वर्षे) यांना अटक केली.
मृतदेहाचे केले तुकडे : याबाबत अधिक माहिती अशी की, 26 ऑगस्ट रोजी खराडीजवळील मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृत महिलेचं वय 40 ते 50 वयोगटातील असावं असा अंदाज पोलिसांना होता. तसंच मृतदेहाचे धडापासुन शिर, खांद्यापासून दोन्ही हात, खुब्यापासून दोन्ही पाय तोडले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयित आरोपीनं मृतदेहाचे तुकडे-तुकडे केल्याचा संशय पोलिसांना होता. शिर, हात, पाय तोडून केवळ धड हे नदी पात्रात फेकून देण्यात आलं होतं.
मिसिंगच्या तक्रारींचा केला अभ्यास :दाखल गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना, पुणे शहरात तसेच पिंपरी चिचवड हद्दीत दाखल 40 ते 50 वयोगटातील महिला मिसिंगच्या घटना तपासण्यात आल्या. यात एकूण दोनशे नागरिक मिसिंग असल्याचं दिसून आलं. नदी पात्रात फेकून दिलेल्या मृतदेहाचे इतर भागांचाही तपास नदीत पाणबुडी, ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून घेण्यात आला.