पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Crime News : ऐन गणेशोत्सवात पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
नेमकं काय घडलं? :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक आवळे आणि मृत तरुणी गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सदरील तरुणीचं लग्न झालेलं होतं. मात्र, 2018 साली तिच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर तिचे आरोपी विनायक आवळेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून दोघंही लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र, मंगळवारी रात्री दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात विनायकने तरुणीची हत्या केल्याचा संशय आहे. तसंच हत्या केल्यानंतर त्याने तरुणीचा मृतदेह रिक्षात टाकून तो रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभा केला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकनं केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचली असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.