मुंबई- बारा वर्षीय मुलीचा गर्भपात करण्यासाठी परवानगी द्या, अशी पीडितेच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जे. जे. रुग्णालयाने मुलीची वैद्यकीय तपासणी करुन 13 मेपर्यंत तातडीनं अहवाल सादर करावा, असे खंडपीठानं निर्देशात म्हटलयं.
पालघर जिल्ह्यातील एका कुटुंबात 14 वर्षीय सख्या भावानं 12 वर्षीय लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात दुखु लागल्यानं तिने आईला सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना मुलगी गर्भवती असल्याचा संशय आला. तपासण्यानंतर ती गर्भवती असल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर मुलीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ऑक्टोबर महिन्यापासून तिचा 14 वर्षीय मोठा भाऊ तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता. कोणाला सांगितल्यास धमकावत होता, असे पीडित मुलीनं सांगितलं.
गर्भाला 24 आठवडे पूर्ण झाल्यानं वाढली गुंतागुंत-मुलीनं दिलेल्या माहितीनंतर हादरलेल्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवून मुलाला बालसुधारगृहात पाठवले. जे. जे. रुग्णालयात 4 मे रोजी मुलीची तपासणी केल्यावर गर्भाला 24 आठवडे आणि 5 दिवस पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. गर्भवती मुलीचं वय अवघे 12 वर्ष असल्यानं तिच्या पोटातील गर्भाच्या वाढीला अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.