मुंबई Indrani Mukherjea : बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संसयित आरोपी असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जी हिला विदेश प्रवासासाठी देण्यात आलेली परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस सी चांडक यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी त्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द केला. त्यामुळे हा इंद्राणी मुखर्जीला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
विदेश प्रवासाला दिलेली परवानगी रद्द :विशेष न्यायालयानं इंद्राणीला स्पेन आणि युकेमध्ये बँकिंगशी संबंधित कामं करुन घेण्यासाठी तीन महिन्यात दहा दिवस जाण्यासाठी परवानगी दिली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील श्रीराम शिरसाट यांनी सदर कामांसाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज नसून इथून ऑनलाईन पद्धतीनं कामं करता येऊ शकतात, असं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला भारतसोडून विदेशात जाण्याची काहीही गरज नाही. मात्र, इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी हा दावा खोडून काढला. इंद्राणी मुखर्जीला तिच्या बँकेशी संबंधित कामांसाठी प्रत्यक्ष स्पेन आणि युकेमध्ये हजर राहणं आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.