मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीला पाच वर्षानंतर जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण अत्यंत परखड आहे. पीडित मुलीला आपण काय करतोय याबाबत पुरेशी माहिती असल्याचे आणि तिचे आरोपीसोबत सहमतीचे संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. पोक्सो कायदाचा तारतम्यानं वापर झाला पाहिजे असंही यातून सुचित करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात आहे. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपी विरोधात अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे.
काय आहे नक्की प्रकरण : २०१९ साली पीडित अल्पवयीन मुलगी अंधेरीत राहणाऱ्या विवाहित बहिणीला भेटायला जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली. ही मुलगी चार दिवसानंतर तिच्या वडिलांना जुहू चौपाटीवर एका १९ वर्षीय मुलासोबत फिरताना दिसली. मधल्या चार दिवसाच्या कालावधीत मुलीसोबत पालकांचा संपर्क झाला नव्हता. मुलगी सापडल्यानंतर मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुणाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुलगी अल्पवयीन असल्यानं पोक्सो कायद्यानुसार त्या तरुणावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यावर पाच वर्षांनी आरोपीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं पीडित मुलीच्या जबाबामध्ये आणि तिच्या वडिलांच्या जबाबामध्ये मोठा फरक असल्याचं निदर्शनास आणलं. मुलीनं तिच्या जबाबमध्ये सदर आरोपी मुलासोबत दोन वर्षापासून प्रेम संबंध असल्याचं मान्य केलं आणि परस्पर सहमतीनं संबंध असल्याचं मान्य केलं. या प्रकरणात पीडित मुलीनं स्वतःच्या आई-वडिलांना कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न देता स्वतःच्या मर्जीनं घर सोडून चार दिवस आरोपीसोबत घालवण्याचं मान्य केलं, याकडं न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं.