मुंबईBMC Property Tax Collection :संपूर्ण कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यानं मुंबई पालिकेच्या तिजोरीवर यावर्षी मोठा ताण असणार आहे. पूर्ण कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका प्रशासनामार्फत टॉप टेन मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्याचा देखील फायदा झालेला दिसून येत नाही.
काय म्हणाले सहआयुक्त :या संदर्भात करनिर्धारण व संकलन विभागाचे सहआयुक्त सुनील धामणे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा मालमत्ता कर नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे भरणा करावा यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याने वर्षभर प्रयत्न केले. परिणामी, रविवारी 31 मार्च, 2024 पर्यंत मालमत्ता कराची वसुली ही 3 हजार 195 कोटी 91 लाख 11 हजार रुपये इतकी झाली आहे."
मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित :सहआयुक्त सुनील धामणे म्हणाले की, करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष 2023-24 ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी 2024 अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सोबतच मागील थकबाकी वसुलीसाठी परिश्रम घेण्यात आले. त्याचा परिणाम देखील दिसून आला. 19 मार्च या एकाच दिवसात तब्बल 100 कोटी रुपयांचे संकलन झाले. २८ मार्च रोजी 304 कोटी रुपये, 29 मार्च रोजी 171 कोटी रुपये, 30 मार्च रोजी पुन्हा 171 कोटी रुपये आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी 190 कोटी 34 लाख रुपयांचे कर संकलन करण्यात आम्हाला यश आले.