महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, मागील वर्षाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ - BMC BUDGET 2025

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प (Budget) सादर झाला आहे. मागील वर्षीच्या म्हणजे वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

BMC budget news
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Source- ETV Bharat reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 1:07 PM IST

Updated : Feb 4, 2025, 3:24 PM IST

मुंबई : आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प (BMC budget news) सादर झाला आहे. प्रशासकीय राजवटीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी पालिकेने तब्बल 74,427 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षीच्या म्हणजे वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर :या वर्षाचा अर्थसंकल्पात शिक्षण विभागाला 3 हजार 955 कोटींची तरतूद करण्यात आली असून, बेस्ट उपक्रमाला 1 हजार कोटी देण्यात आले आहेत. तर, रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5 हजार 100 कोटींची कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत पालिकेचे विविध प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांसाठी देखील विशेष तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा म्हणजे दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकलपात 4 हजार 300 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1 हजार 957 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



कचरा संकलनावर कर लागू करणं आवश्यक: यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत पालिका घनकचऱ्यावर कर आकारणार अशा केवळ चर्चा होत्या. मात्र, या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी कर लागू करण्यात येणार असल्याची घोषणाच पालिका प्रशासनानं केली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठीचा खर्च वाढल्यानं कचरा संकलनावर कर लागू करणं आवश्यक असल्याचं पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊनच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असं देखील आयुक्तांनी म्हटलं आहे.

कोळीवाड्यांच्या विकासासाठी तरतूद: दुसरीकडं वातावरणीय बदलाचा मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हिवाळ्यात मुंबईतील प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी 113.18 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर, पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभासाठी 7 हजार 380.43 कोटींची तरतूद केली आहे. सोबतच मुंबईमध्ये सुयोग्य जागी लंडन आयच्या धरतीवरती सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत मुंबई आय उभरण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. तर, मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 25 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात अग्निशमन दलासाठी 261.72 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.



गाळेधारकांना मालमत्ता कर भरावा लागणार: यावर्षीच्या अर्थसंकल्पात आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 309 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, उद्यान विभागासाठी 220.12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात संचालक नियोजन खात्यासाठी 51.98 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बाजार खात्यासाठी 181.53 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता झोपडपट्टीतील देखील व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कर भरावा लागणार असून, झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल पालिकेला अपेक्षित आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे अडीच लाख झोपडपट्ट्या असून, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे, दुकाने, गोदाम आणि हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर होत आहे. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे.


विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार :मुंबईत एक ऐतिहासिक पर्यटन सिटी आहे. येथे दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी देखील या अर्थसंकल्पात पालिकेने विशेष तरतूद केल्याचं दिसून येत आहे. यात राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचं शिल्प उभारलं जाणार आहे. काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार आहे.

मलनिस्सारण प्रकल्पासाठी केली तरतूद : मुंबईतील पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये CBSC बोर्डाच्या चार शाळा उभारण्यात येणार आहेत. सोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना, स्वयंरोजगार, विविध कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात येणार येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. याकरिता 51.98 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1 हजार 333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. रस्त्यांच्या काँक्रीट करण्याचं काम पालिका दोन टप्प्यांमध्ये करत असून, यामधील टप्पा एक मधील 75 टक्के कामे आणि टप्पा दोन मधील 50 टक्के कामे जून 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळं पावसाळ्यात खड्डे पडण्याच्या समस्येचं प्रमाण कमी होईल असा महानगरपालिकेचा दावा आहे. तर, मुंबई मलनिस्सारण प्रकल्पासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात 6 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी?

  • बृहन्मुंबईच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 3 हजार 955 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • बेस्ट उपक्रमाला 1 हजार कोटी देण्यात आले आहेत. तर, रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5 हजार 100 कोटींची कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मुंबईत पालिकेचे विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठीदेखील विशेष तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • कोस्टल रोडचा तिसरा टप्पा म्हणजे दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 4 हजार 300 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1 हजार 957 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • बेस्ट उपक्रमातून दररोज सुमारे 3 हजार बसमधून 30 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली जाते. बेस्टच्या आर्थिक स्थितीचा विचार करून 1 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे.
  • अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार बेस्टला देण्यात येणारा निधी पायाभूत सुविधा, विकास, भांडवली उपकरणे खरेदी, कर्ज परतफेड, भाडेपट्ट्याच्या बसेस, वेतन सुधारणा, दैनंदिन कामकाज, कर्मचाऱ्यांचे दिवाळी बोनस, पेन्शनधारकांची देणी आणि वीज बिलांसाठी वापरला जाणे अपेक्षित आहे.
  • बीएमसीकडून बेस्टला 2012-13 पासून 11,304.59 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर बेस्टला सुमारे 9,500 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.

हेही वाचा-

  1. राजूल पटेलांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, आता अनिल परब म्हणतात...
  2. स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
Last Updated : Feb 4, 2025, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details