महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माहीम मतदारसंघात भाजपाची भूमिका काय? अमित ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

माहीम मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत चर्चंना उधाण आलय. राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यानं त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत.

अमित ठाकरे देवेंद्र फडणवीस
अमित ठाकरे देवेंद्र फडणवीस (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 10:27 PM IST

मुंबई : माहीमच्या जागेवर तिरंगी लढत होणार का? कुणाचं पारडं भारी पडणार? अशा चर्चा सध्या मुंबईत रंगू लागल्या आहेत. त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी माहीम विधानसभा मतदारसंघाची निवड केली. आता या जागेवरून महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांना या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल अशा चर्चा होत्या. या चर्चेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे.


फडणवीस नेमके काय म्हणाले - एका कार्यक्रमात माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्ष अमित ठाकरे यांना समर्थन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. फडणवीस म्हणाले, "अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की जर त्यांचा पक्ष निवडणूक लढला नाही तर त्यांचे मतदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जातील. अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाची भूमिका स्पष्ट आहे."


माहीममधील मतांची विभागणी - माहीममध्ये मनसेने जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी, मनसेची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही. 2009 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला असता, मनसेला या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत 40 हजारहून अधिक मतं मिळत आली आहेत. 2009 मध्ये याच विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती.


मनसेचे माहीममधील बळ - 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना 61 हजार 337 मतं मिळाली होती. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना दुसऱ्या क्रमांकाची 42 हजार 690 मतं मिळाली होती. त्यामुळे माहीममध्ये मनसेचा मतदार नाही असं म्हणून चालणार नाही. यात मनसेला भाजपाचा पाठिंबा मिळाला तर, त्या मतांची आणखी भर पडेल. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपाने विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती.


दुहेरी फायदा मिळणार - आता मनसेचे स्वतःचे चाळीस हजार मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 33 हजार मतदार एकत्र केल्यास अमित ठाकरे यांना साधारण 70 हजार मते मिळू शकतात. या भागात भाजपचे देखील मतदार आहेत हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा...

  1. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर...; सदा सरवणकरांची भावनिक पोस्ट
  2. भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details