छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे. राज्यातील सर्वात लक्षवेधी मतदार संघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर शिवसेनेचे सर्वाधिक पाच आमदार याच जिल्ह्यातून फुटले. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात मोठा धक्का बसला. आता बाहेर पडलेल्या या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण दोन मतदार संघात मित्र पक्ष असलेला भाजपाच विरोधात दंड थोपटून असल्यानं विजयासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांना विशेष ताकद लावावी लागणार आहे.
'हे' पाच आमदार गेले एकनाथ शिंदे सोबत :छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. 1988 पासून महापालिकेत शिवसेनेनं भाजपासोबत कायम सत्ता मिळवली. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असणारा जिल्हा म्हणून प्रचलित असलेला हा जिल्हा आहे. औरंगाबाद या शहराला सर्वात आधी संभाजीनगर हे नाव त्यांनीच दिलं. शहराचे शिवसेनेचे पाहिले महापौर प्रदीप जैस्वाल मध्य विधानसभा मतदार संघाचे सध्याचे आमदार आहेत. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत बंड केलं. त्यांच्यासोबत पैठण मतदार संघात चार वेळा सेनेनं आमदार केलेले संदीपान भुमरे, पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट, काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूर मतदार संघात पहिल्यांदा निवडणूक लढवलेले रमेश बोरनारे असे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. यात जिल्ह्यातील सेनेचे सहावे आमदार उदयसिंह राजपूत हे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. सहा पैकी पाच आमदारांनी बंड केल्यानं शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मात्र हादरा बसला.
दोन मतदार संघात भाजपा विरोधात :बंड केल्यावर या पाच आमदारांना आपला विजय निश्चित करणं आव्हानात्मक असणार आहे. गद्दार नावानं आधीच विरोधक त्यांना हिणवत आहेत. तर, लोकसभेत जालना मतदार संघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानं सिल्लोड आणि पैठण मतदार संघात भाजपा नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या विरोधी भूमिका घेत आहेत. दोनही मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. पैठण येथील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उमेदवार असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा म्हणावा तसा प्रचार केला नाही. तर सिल्लोड मतदार संघात आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही. उलट काँग्रेस उमेदवार डॉ कल्याण काळे विजयी झाल्यावर त्यांचं स्वागत केल्यानं भाजपाला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. मित्र पक्ष असताना साथ दिली नसल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेच्या या आमदारांचा विजय त्यांच्या अस्तित्वासाठी महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे.
अब्दुल सत्तार विरोधात व्यक्त होत आहे रोष :सिल्लोड मतदार संघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार विरोधात भाजपा चांगलाच आक्रमक झाला असून उघडपणे विरोध करत आहे. लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघात पराभव झाल्यावर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस उमेदवाराचे गुणगान गायले. त्यांनतर भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी त्या मतदार संघाची उपमा पाकिस्तान अशी केली. त्यावर संतप्त झालेल्या आमदार सत्तार समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला. त्यांनतर भाजपाचा दबदबा असलेल्या ग्रामपंचायतमध्या अब्दुल सत्तार यांनी नवरात्रीत महिलांना भेट दिलेल्या साड्या जाळण्यात आल्या. एका ग्रामपंचायतमध्ये स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपानं रस्ता होऊ दिला नाही, असं प्रसिद्धी पत्रक काढलं. त्यामुळे महायुतीत मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
- अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या, संतापामागं वेगळंच कारण आलं समोर
- एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
- संजय शिरसाट यांना पुन्हा हुलकावणी : अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी वर्णी - Abdul Sattar New Guardian Minister