बीड - जिल्हा नियोजन समितीची बैठक आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला शासनानं डीपीसीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. बीडमधून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली गेली आहे. यात आ. सुरेश धस यांना डावलल्याची चर्चा आहे.
राज्यातील सर्वच जिल्हा नियोजन समित्यांच्या नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या नियोजन विभागाने घेतला होता. त्यानंतर बुधवारी नव्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आ. विजयसिंह पंडित आणि आ. नमिता मुंदडा या दोघांना नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती मिळाली आहे. इतर आमदार हे लोकप्रतिनिधी या नात्याने बैठकीस उपस्थित राहू शकतात, मात्र ते थेट डीपीसीचे सदस्य नसतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी असलेल्या जवळीकीतून आ. पंडित यांची नियुक्ती राष्ट्रवादीकडून झाली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरु लागली आहे.