ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं शिंदे सरकारमध्ये भाजपाच्या वतीनं पुन्हा एकदा आमदार रवींद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. आता मात्र चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या चव्हाण यांचं संघटन कौशल्य पाहून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यातील पक्ष संघटनेची जबाबदरी देत त्यांच्या गळ्यात प्रदेश अध्यक्ष पदाची माळ घातली आहे. त्यांच्या जीवनातील राजकीय प्रवासाची थोडक्यात गाथा ई टीव्ही भारतच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न.
आमदार तथा माजी मंत्री चव्हाण यांचा जन्म तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात झाला. तर त्यांच बालपण मुंबईत भांडुप परिसरात गेलं. त्यानंतर चव्हाण हे आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत स्थाईक झाले. त्यांना तरुण वयात डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यतः रा. स्व. संघ आणि भाजपाचे भारतीयत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यानंतर राजकीय प्रवास सुरू झाला. २००२ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. तर २००५ साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदावर विराजमान झाले.