नाशिक Worms in saline:नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी खासगी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सलाईनमध्ये अळी सापडली होती. हा मुद्दा नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या वडाळा रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका बालकावर उपचार सुरू असताना सलाईनमध्ये अळी आढळून आली होती. धीरज सोनवणे यांचा लहान मुलगा हितेश हा व्हायरल इन्फेक्शनने आजारी असल्याने त्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यासंदर्भात धीरज सोनवणे यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे तक्रार केली.
हा तर रुग्णाच्या जीवाशी खेळ :साखळी श्रेणीतील हे मोठं हॉस्पिटल असतानाही त्यांच्याकडून अक्षम्य चूक घडली होती. रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. पुढे मात्र सह्याद्री हॉस्पिटलने हे प्रकरण अंतर्गतरित्या दाबण्याचा प्रयत्न केला; परंतु या घटनेची गंभीर दखल स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांना घ्यावीच लागली. विधिमंडळाच्या अधिवेशनात आईस्क्रीममध्ये आढळलेल्या तुटक्या बोटाचा प्रश्न चर्चेला आला असता त्याला पूरक प्रश्न म्हणून आमदार देवयानी फरांदे यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सलाईनमध्ये अळी आढळून आल्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.