सिंधुदुर्गAshish Shelar:रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा मोदींना पाठिंबा देणारा असेल. विनायक राऊतांनी केवळ भाजपावर टीका करून फक्त बातम्या छापून आणल्या, अशी खोचक टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. यावेळी ते सावंतवाडी येथील महायुतीच्या कार्यालयातून बोलत होते. महायुतीचा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांचा समर्थक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत असं समजून आम्ही कामाला लागलो आहेत. चार दिवसात महायुतीचा उमेदवार जाहीर होईल. हा मतदारसंघ भाजपाला मिळावा आणि नारायण राणे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. राणे हे केंद्रीय मंत्री आणि मोदींच्या मंत्रिमंडळात असल्यानं त्यांची मागणी होत आहे. महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुती एकत्र आहे, एकत्र राहील. मोदींना पाठिंबा देणारा खासदार इथून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा अॅड. शेलार यांनी केला.
उद्धव ठाकरे अहंकारी नेता :भाजपाला मोदी परिवार वाढवायचा आहे, तो वाढत आहे. या परिवारात येईल त्याला सामील करून घेतलं जाईल. दरम्यान, जो चोरी करतो त्यांच्यामागे ईडी लागते ती लागली पाहिजे. ईडी मागे लागली की, राजकीय हेतूने लागली असं सांगितलं जात. ईडी मोदी सरकारनं सुरू केलेली नाही असं ते म्हणाले. तर चार पक्ष लढतात त्यावेळी कोणता पक्ष निवडून येऊ शकतो? कोणता उमेदवार येऊ शकतो यावर चर्चा होते. आमच्यात चर्चा आहे विसंवाद नाही. यामागे रणनिती देखील असते. देशात सगळ्यात अहंकारी नेता उद्धव ठाकरे आहेत. त्यांचं कधी चुकत नाही ते म्हणातत तेच खरं असं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नये, असा टोला ठाकरेंना हाणला. आम्ही अहंकारात जगत नाही. अतिआत्मविश्वासात आम्ही राहत नाही असा टोला लगावला.