महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणा दाम्पत्याला भाजपा नेत्यांचा विरोध; नवनीत राणांसारखं रवी राणांना घरी बसवून राबवणार 'पती पत्नी एकत्रीकरण योजना'

माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अमरावतीमधील भाजाप नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच नवनीत राणांनतर आता भाजपा नेते रवी राणांना विरोध करत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

BJP Leader Opposed To Navneet Rana
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

अमरावती : "प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंना दहीहंडीच्या कार्यक्रमाला बोलावून मी कधीही भाजपामध्ये येणार नसल्याचं रवी राणांनी ठणकावून अपमान केला. तेच रवी राणा आता मात्र मी भाजपा समर्थित उमेदवार आहे, असा अपप्रचार करत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मिळून रवी राणा यांना बडनेरा मतदार संघात धडा शिकवणार आहोत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या घरी बसल्या तसंच यांना देखील घरचा रस्ता दाखवून पती-पत्नी एकत्रीकरण योजना राबवून नांदा सौख्यभरे अशा शुभेच्छा देऊ," अशी भूमिका भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा करणारे तुषार भारतीय यांनी घेतली. शुक्रवारी रात्री बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला तुषार भारतीय यांनी संबोधित केलं, यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

भाजपा कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं दुःख सारखंच :"पाऊस असो, थंडी असो शेतकरी शेतात राबराब राबतो. मोठ्या मेहनतीनं शेतकरी आपल्या शेतात पीक घेतो, हे पीक जेव्हा कापायची वेळ येते तेव्हा आपल्या शेतातलं पीक दुसऱ्यांनं कापून नेलेलं त्याला दिसल्यावर प्रचंड दुःख होतं. अगदी अशीच परिस्थिती आज भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली. बडनेरा आणि अमरावती मतदारसंघात गत चार वर्ष 11 महिने बूथ प्रमुख, पेज प्रमुख म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी कामं केलीत. मन की बात ऐकली. सामूहिक मन की बात ऐकायला देखील आम्ही एकत्र आलोत. आज मात्र बडनेरा आणि अमरावती दोन्ही ठिकाणी भलतीच व्यक्ती येऊन आमच्या भरवशावर निवडणूक लढण्यास तयारीला लागली. हा संपूर्ण प्रकार म्हणजे आपण आपल्या डोक्यावर हात मारून घ्यावा असाच आहे. बाहेरची व्यक्ती लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणं आपल्या पक्षात अचानक टपकली तशीच विधानसभा निवडणुकीत देखील टपकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र राहिले तर अशा मंडळींना संधी मिळणार नाही. यामुळे आपण एकत्र यायला हवं," असं तुषार भारतीय म्हणाले.

राणा दाम्पत्याला भाजपा नेत्यांचा विरोध (Reporter)

केवळ सत्तेसाठी आपला वापर :"बडनेरा आणि अमरावती हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गत साडेचार -पाच वर्षात प्रचंड मेहनत घेतली. आपली भूमिका ही कायम सेवेची होती आणि आहे. आता आपल्या भरोशावर निवडणूक लढण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना केवळ सत्ता हवी आहे. त्यांचा सेवेंशी कुठलाही संबंध नाही," असा आरोप देखील तुषार भारतीय यांनी केला.

रवी राणांच्या वक्तव्याचा घेतला समाचार :अमरावती शहरात महिनाभरातच हत्येच्या आठ घटना समोर आल्यात. नवनीत राणा या पराभूत झाल्यामुळे शहरात हत्येच्या घटना वाढल्या, असं वक्तव्यं आमदार रवी राणा यांना शोभणारं नाही. आता रवी राणा निवडणुकीत हरले तर हत्येच्या आणखी घटना वाढतील का, असा सवाल तुषार भारतीय यांनी उपस्थित केला. शहरातील गुन्हेगारी संदर्भात पोलिसांवर टीका करणारे रवी राणा यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी निधी का खर्च केला नाही. तेव्हा ते झोपले होते का, असा प्रश्न देखील तुषार भारतीय यांनी उपस्थित केला.

रवी राणा आमदार नव्हे सावकार :"आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघात कोणतंही विकास काम केलेलं नाही. बडनेरा मतदारसंघातील अनेक गावात पक्के रस्ते नाहीत. राजुरा, चिरोडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील राणा सोडवू शकले नाहीत. अनेक गावांची अवस्था अतिशय खराब आहे. असं असताना आमदार रवी राणा यांनी आपल्या अनेक स्विय सहाय्यकांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून देण्याच्या नावाखाली पैसे खाल्लेत. पैसे खाऊन देखील अनेकांची कामं केली नाहीत. मतदार संघातील शासकीय जमिनी राणांनी हडपल्या. भातकुली येथील एमआयडीसीची जमीन गिळंकृत केली. राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत," अशी टीका देखील तुषार भारतीय यांनी केली.

अनेक नेत्यांनी फिरवली संवाद मेळाव्याकडं पाठ :अमरावती बडनेरा मार्गावरील एका सभागृहात बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेत हा मेळावा आयोजित करण्यात आला असताना खुद्द प्रवीण पोटेच कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितांमध्ये पत्रिकेत प्रदेश कार्यकारणी सदस्य जयंत डेहाणकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर, दिनेश सूर्यवंशी यांची नावं होती. मात्र यापैकी कोणीही बैठकीला आले नाहीत. कार्यक्रम पत्रिकेत विनीत म्हणून नाव असणारे चेतन पवार, विवेक कलोती हे शहर जिल्हा सरचिटणीस देखील अनुपस्थित होते. पक्षाचे जुने पदाधिकारी प्रा. रवींद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. पक्षाच्या माझी जिल्हाप्रमुख निवेदिता चौधरी, संजय नरवणे, चेतन गावंडे, किरण महल्ले या तीन माजी महापौरांसह बडनेरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती शहरातील पक्षाचे सर्व माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मात्र संवाद बैठकीला गर्दी केली.

हेही वाचा :

  1. "...तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेईन", आमदार रवी राणांचं वादग्रस्त विधान - Ravi Rana On Ladki Bahin
  2. अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024
  3. 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details