मुंबई Sachin Vaze vs Anil Deshmukh :मागील काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात शंभर कोटी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. त्यातच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या वक्तव्यानं आगीत तेल टाकण्याचं काम केलं आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांच्या हातात आयतं कोलीत लागलं. अनिल देशमुख प्रकरणावरुन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं आहे. दुसरीकडं भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचा जामीन तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही भाजपा नेत्यांनी केली.
अनिल देशमुखांवर शंभर कोटी प्रकरणात गंभीर आरोप :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी प्रकरणात गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांच्याकडं त्यांच्या पीए मार्फत पैसे जात होते, याचे पुरावे सुद्धा सीबीआयकडं आहेत. सचिन वाझे यांनी स्वतः पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना शंभर कोटी वसुलीची माहिती आणि पुरावे दिले आहेत. याप्रकरणी सचिन वाजे यांनी या प्रकरणी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे, असं सांगितल्यानं या प्रकरणाला नवीन वळणं लागलं आहे. इतकंच नाही, तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं सुद्धा नाव असल्याचं सचिन वाझे यांनी सांगितल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आल्या नाहीत.
सचिन वाझेला कोणाचा आशीर्वाद ? :या प्रकरणावर बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून पैशाची वसुली करत होते, हा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. हा अतिशय गंभीर आरोप आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला, त्यामध्ये त्यांनी जे आरोप केले, त्याचा पुनरुच्चार सचिन वाझे यांनी केला. शंभर कोटीची वसुली असेल, डान्सबारचे पैसे असतील, मनसुख हिरेनची हत्या असेल, याव्यतिरिक्त अंबानी यांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं प्रकरण असेल हे सर्व कृत्य करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझे यांना तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता. म्हणून सचिन वाझेला पुन्हा नोकरीत आणताना त्या पेपरवर सह्या कुणाच्या घेतल्या, त्याला आशीर्वाद कोणाचा होता, हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणी एसआयटी नेमून सचिन वाझे यांची पुन्हा चौकशी व्हायला पाहिजे. त्याची सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे. यामध्ये वेळप्रसंगी अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून ज्याप्रकारे अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्या चौकशीमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री आणि इतर कुठल्या मंत्र्यांचा सहभाग होता, हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.