मुंबई BJP Complaint Against Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपानं संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केलीय. 'नरेंद्र मोदी यांचा जन्म जिथं झाला तिथंच औरंगजेबाचा जन्म झाला. त्यामुळंच मोदींची औरंगजेबसारखी मानसिकता आहे.' असं वादग्रस्त विधान संजय राऊत यांनी बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केलं होतं, असा भाजपाचा आरोप आहे. त्यावर भाजपानं आक्षेप घेत या भाषणाची सीडी निवडणूक आयोगाला सादर केलीय. संजय राऊतांचं विधान आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं भाजपानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंचा सहभाग : कलम 125 नुसार दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण केल्यास 3 वर्षांची शिक्षा आहे. तसंच, IPC च्या कलम 153A, 153B तसंच 499 चा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनाकरन विरुद्ध सीटी पब्लिक, तसंच अभिराम सिंगविरुद्ध सीडी कोम्माचेन यांच्याबाबत दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे निकालही तक्रारीबरोबर भाजपानं जोडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानं उद्धव ठाकरे हे या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपानं केलाय.