मुंबई Emergency a Black Day : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित २५ जून १९७५ रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्व जिल्हा स्तरावर जनजागृती प्रबोधनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, अभियानाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्षद्वय जयप्रकाश ठाकुर आणि ॲड. धर्मपाल मेश्राम आणि उद्योग आघाडीचे संयोजक प्रदीप पेशकर यांनी दिली आहे.
‘आणीबाणी एक काळा दिवस’: भारतीय संविधानावरच मोठा प्रहार हा २५ जून १९७५ रोजी देशात लागू, आणीबाणी लागू करून करण्यात आला. हा निर्णय देशातील व्यक्तीस्वातंत्र्यावर एक मोठा आघात होता. म्हणून यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी व जनतेपुढे सत्य यावे, या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक “विशेष अभियान” २५ जून रोजी हाती घेण्यात आले आहे. या अनोख्या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणीबाणीचे क्रुर सत्य जनतेसमोर मांडतील. त्याचप्रकारे काँग्रेसकडून समाजामध्ये जे मनभेद आणि मतभेद निर्माण केले जात आहेत, संविधान बदलण्याचे जे नरेटिव्ह काँग्रेसनं तयार केले आहे, त्याबाबत सुद्धा नागरिकांना जागरूक केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर आयोजित या प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहून देशातील काळ्या दिवसाचे सत्य जाणून घ्यावं, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं आहे.