मुंबई Maharashtra MLC Polls 2024 :विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. निरंजन डावखरे यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव करत त्यांना चांगलाच धक्का दिला. पदवीधर निवडणूक 2024 ची कोकण मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ इथल्या आगरी कोळी संस्कृती भवन इथं पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मतं वैध ठरली तर 11 हजार 226 मतं अवैध ठरली, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली.
भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत :कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 मध्ये भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी बाजी मारत काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मतं घेवून निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केलं.