अमरावती/जालना Heavy Rain Affected BJP Prachar Office : शनिवारी पहाटे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. या वादळी पावसात कुठं शाळेचं छत उडालं, तर कुठं भाजपा आणि प्रहारचं कार्यालय उडाल्यानं मोठा हाहाकार दिसून आला. अमरावती शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. या पावसामुळं अमरावती शहरातील आयर्वीन चौक, खापर्डे बगीचा रेल्वेस्थानक या परिसरात मोठ्या संख्येनं झाडं कोलमडून पडली असून विजेचं खांबही कोसळले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात असणारं भाजपाचं मुख्य कार्यालय तसेच खापर्डे बगीचा परिसरात असणारं प्रहारचं प्रचार कार्यालय देखील या वादळात पूर्णतः उद्ध्वस्त झालं. तर जालन्यात वादळी पावसात 14 जनावरं दगावली आहेत.
छत्रपती शिवरायांचा पुतळा असणारी ट्रॉली उलटली :कापडणे बगीच्या परिसरात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचार कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा विराजमान असणारी ट्रॉली या वादळामुळं उलटली. या ट्रॉलीखाली दुचाकीचं नुकसान झालं. प्रचार कार्यालयाचा मंडप देखील उडाला असून प्रचार कार्यालय पूर्णतः विस्कळीत झालं आहे.
भाजपाचं प्रचार कार्यालय उद्ध्वस्त :भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचं अमरावती रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेलं भव्य प्रचार कार्यालय वादळी पावसात पूर्णतः उद्ध्वस्त झालं. भाजपाच्या प्रचार कार्यालयासमोरील रेल्वेच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांचे कट आउट देखील अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. इर्विन चौक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले अनेक कापडी स्टॉल देखील या वादळात उडून गेले.
खापर्डे बगीचा परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद :शहरातील खापर्डे बगीचा परिसरात जाणारे सर्व पाचही रस्ते झाडं आणि विजेचे खांब पडल्यामुळं बंद झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून खापर्डे बगीचाकडे जाणाऱ्या मार्गावर झाडं उलमडून पडली. तसंच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून खापर्डे बगीचा परिसरात जाणारा मार्ग देखील विजेचे खांब कोसळल्यामुळं बंद झाला. रेल्वे स्थानकाकडून खापर्डे बगीचाकडं जाणाऱ्या मार्गावर देखील अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळं या परिसरात पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती.
अनेक शाळांना सुट्टी :शहरातील होली क्रॉस, आदर्श शाळा यासह अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श माध्यमिक शाळेच्या भिंतीवर भलं मोठं झाड कोसळलं. शाळेला असणाऱ्या दोन्ही बाजूंच्या मार्गांवर झाडं कोसळल्यामुळं शाळेत जाण्याचा रस्ता बंद झाला. झाडांबरोबरच शाळेलगत विजेचे खांब देखील कोसळले आहेत. आज सकाळी साडेसात वाजता विद्यार्थी शाळेकडं आले असताना शाळेतील शिक्षकांनी त्यांना परत घरी जाण्यास सांगितलं. शाळेतील शिक्षक देखील बराच वेळपर्यंत शाळेबाहेरच उभे होते.