छत्रपती संभाजीनगर BJP Protest Against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित वक्तव्याविरोधात देशभर पडसाद उमटत आहे. शुक्रवारी (13 सप्टेंबर) भाजपा तर्फे देशभर निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक भागात भाजपा महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी घटना बदलणार असा प्रचार काँग्रेस तर्फे करण्यात आला होता. तेव्हा त्यावर भाजपा नेते स्पष्टीकरण देण्यास कमी पडल्याचं बोललं जात होतं. मात्र, राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळं आता भाजपाला आयतं कोलीत मिळाल्यानं ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या आंदोलनांनी भाजपाची प्रतिमा विधानसभेत बदलण्यास यश मिळेल का? असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं भाजपा आक्रमक : अमेरिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाची प्रगती झाली, सगळ्या समस्या संपल्या, सर्वांना समान संधी मिळाली की आरक्षण रद्द करण्याबाबत आढावा घेतला जाईल, अशा आशयाचं वक्तव्य केलं. या विधानामुळं भाजपानं काँग्रेस विरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात भाजपातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आंदोलन पुकारलं. क्रांतीचौक भागात राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर भाजपा संविधान बदलणार असा प्रचार करणारे स्वतः आज तो बदलण्याची भाषा करत असल्यानं काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आल्याचा आरोप मंत्री अतुल सावे यांनी केलाय.