महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाचं मिशन महापौर: स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा पक्षाकडं आग्रह, शिवसेनाही तयार, पण . . . - MAHARASHTRA CORPORATION ELECTION

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे भाजपानं 'मिशन महापौर'ची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडं शिवसेनाही स्वबळाची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Corporation Election
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 20 hours ago

Updated : 18 hours ago

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता घेणारे महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. राज्यातील सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपामधील पदाधिकाऱ्यांनी 'मिशन महापौर'चा नारा देत आपल्या पक्षाकडे आगामी महानगर पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर मागील आठवड्यापासून सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांना सदस्य नोंदणी करण्याचं ध्येय देण्यात आलं आहे. यावर शिवसेनेनं एमआयएम पक्षाला थांबण्यासाठी युती गरजेची आहे. मात्र वेळ आल्यास आमची यंत्रणा देखील सक्षम असल्याचं सांगितलं आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांचं 'मिशन महापौर' : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या. यात पिछेहाट झालेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत मात्र अपेक्षपेक्षा जास्त आणि आश्चर्यकारक यश मिळालं. राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं पक्षातील कार्यकर्त्यांची उत्साह चांगलाच वाढला आहे. त्यात आता आगामी महानगर पालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पक्षाचं काम सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात पक्षाला यश मिळालं असून महानगर पालिका निवडणुकीत यश मिळवून महापौर पद मिळवणं योग्य राहील, असं मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. याबाबत वरिष्ठ पातळीवर कार्यकर्त्यांचं म्हणणं मांडलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.

भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर (Reporter)

सर्व प्रभागात सदस्य नोंदणी अभियान :विधानसभा निवडणूक झाल्यावर लगेच भाजपा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रभागात सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि अन्य स्थानिक नेत्यांना दोनशे सभासदांच्या नोंदणीचं ध्येय देण्यात आलं आहे. प्रत्येक चौकात आणि भागात पक्षातर्फे मुख्य रस्त्यावर कार्यकर्ते आवर्जून सदस्य नोंदणी करताना दिसत आहेत. विशेषतः नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवार जोमानं काम करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निवडणुका कधी होतील, हे जरी अद्याप स्पष्ट नसलं तरी मिशन महापौरसाठी भाजपा पूर्ण ताकदीनं कामाला लागली, असंच म्हणावं लागेल.

मित्रपक्ष देखील तयार : महायुतीत मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपा तर्फे स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली. त्यावर शिवसेना पक्षाकडून मात्र सावध पवित्रा घेण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणारे निर्णय मान्य राहतील, असं मत जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केलं. "एमआयएम सारख्या पक्षांना थांबण्यासाठी एकत्र निवडणुका लढणं गरजेचं आहे, मात्र भाजपा जर एकटा लढणार असेल, तर आम्ही देखील पूर्ण तयार आहोत. आमच्याकडं शहरातील दोन विधानसभा मतदार संघाचे आमदार सोबतच खासदार देखील आमच्याच पक्षाचे आहेत. माजी सात महापौर आमच्याकडं आले असून अनेक नगरसेवक आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्यानं आम्हाला एकटे लढण्यासाठी विशेष काही करावे लागणार नाही," असं जंजाळ यांनी सांगितलं.

स्थानिक पातळीवर स्वतंत्र निवडणूक लढवणं महत्त्वाचं : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांसोबत जागा वाटपामुळे प्रत्येक पक्षातील पदाधिकारी नाराज होत असतात. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी निवडणूक महत्वाची असल्यानं नाराजी दूर देखील होते. मात्र स्थानिक पातळीवर निवडणुका वेगळ्या पद्धतीच्या असतात. प्रत्येक भागात वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात. त्यांचे मतदार देखील जवळपास निश्चित असतात. अशा वेळी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्याकडं अधिक कल द्यायला हवा, असं मत सर्वच पक्षातील पदाधिकारी व्यक्त करतात. त्यामुळे राज्यात जरी युती आघाडी असली, तरी स्थानिक निवडणुकांत आपली ताकद परखण्यासाठी स्वबळावर निवडणुका लढवणार का? हे पाहण्यासारखं असेल.

हेही वाचा :

  1. Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका
  2. Fadnavis Shinde Government : राज्यात फडणवीस शिंदे सरकार ; नव्या सरकारमध्ये या नेत्यांना स्थान
  3. Eknath Shinde and Devendra Fadnavis: शिंदे फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात हे पुन्हा कॅमेऱ्यात कैद; विरोधक म्हणाले, कठपुतळीचा खेळ..
Last Updated : 18 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details