महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरमध्ये बर्ड फ्लूनं वाढली चिंता, शहरासह परिसरात एक किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित - NAGPUR BIRD FLU

चंद्रपूरनंतर आता नागपूर शहरातही बर्ड फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. त्यामुळे नागपूर प्रशासन अलर्ट झालं आहे.

bird flu outbreak in nagpur administration on alert mode
नागपूर बर्ड फ्लू (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 9:30 AM IST

Updated : Feb 6, 2025, 9:36 AM IST

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली पाठोपाठ आता नागपूर शहरातही 'बर्ड फ्लू'ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'ची प्रकरणं समोर आल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर 'बर्ड फ्लू'बाधित ताजबाग येथील एक किमी त्रिज्येतील क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आलं आहे. येथील कोंबड्यांची मोजणी आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय.

नागपूरच्या ताजबाग येथील एका व्यक्तीकडील 3 कोंबड्या 31 जानेवारी रोजी मृत आढळल्या आहेत. त्यानंतर पशुसंवर्धन विभागानं तपासणी करुन याचे नमुने भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, आनंद नगर, भोपाळ आणि रोग अन्वेषण विभाग, पुणे येथे पाठविले होते. या तपासणीनंतर कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळं झाल्याचं समोर आलंय. या अहवालानंतर प्राप्त अधिकारान्वये मोठा ताजबाग नागपूर शहर आणि त्या आसपासच्या एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. तसंच बाधित क्षेत्रापासून उर्वरित नऊ किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची तसंच निगडित खाद्य आणि अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलाला आदेश देण्यात आले आहेत.

पुढील 21 दिवसापर्यंत प्रतिबंध : ताजबागपासून एक किलोमीटर त्रिज्येतील बाधित क्षेत्रातील परिसर निर्जंतुकीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी, पक्षीखाद्य खरेदी विक्री, वाहतूक बाजार आणि जत्रा तसंच प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसांपर्यंत प्रतिबंध लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

मार्गदर्शक तत्वानुसार विल्हेवाट : मोठा ताजबाग येथील सर्व कोंबड्यांची मोजणी करुन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार विल्हेवाट लावण्यात येईल. यानुसार पशुसंवर्धन विभाग, महानगर पालिका आणि पोलीस पथकानं मोठा ताजबाग भागात कोंबड्यांची मोजणी सुरू केली आहे. हा परिसर निर्जंतुकीकरण करुन प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची विष्ठा आणि इतर कारणामुळं बर्ड फ्लूची लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

  • यापूर्वी चार वाघांचा झाला आहे मृत्यू : यापूर्वी नागपूरच्या गोरेवाडा येथे चार वाघाचा बर्ड फ्लूमुळं मृत्यू झाला होता. तर चंद्रपूरच्या ट्रान्जिट ट्रिटमेंट सेंटर येथे चारपैकी दोन बिबट्याला लागण झाली होती. दोन महिन्यापूर्वी चंद्रपूर येथे 4 गिधाडांचा 'बर्ड फ्लू'मुळं मृत्यू झाला होता.

हेही वाचा -

  1. मराठवाड्याच्या प्रवेशद्वारात बर्ड फ्लूचा शिरकाव; दहा किमी परिसर 'अलर्ट झोन' घोषित
  2. ठाण्यात बर्ड फ्ल्यूचा कहर; चिकन, मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश
  3. उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूमुळं मृत्यू; प्रशासनाकडून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना
Last Updated : Feb 6, 2025, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details