मुंबई-गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उभे असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेचे विद्यमान खासदार अनिल देसाई यांच्या निवडीला आव्हान दिले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्यासहित इतरांविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. त्यामुळे अनिल देसाई यांना दिलासा मिळालाय. विजयी उमेदवार अनिल देसाई आणि इतर 14 उमेदवारांच्या विरोधात ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका तथ्यहीन असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनीही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला फटकारलंय.
उमेदवारी अर्जामध्ये तांत्रिक चूक : या मतदारसंघातून एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये तांत्रिक चूक असल्याचा मुद्दा समोर आणत महेंद्र भिंगारदिवे या उमेदवाराने उर्वरित सर्व 14 उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म अवैध जाहीर करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून केली होती. खासदार अनिल देसाई यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत, एडवोकेट मनीष दोशी, एडवोकेट अंकित लोहिया, एडवोकेट रुबीन वकील, एडवोकेट हर्ष पांडे यांनी बाजू मांडलीय. खासदार अनिल देसाई यांच्यातर्फे बाजू मांडताना एडवोकेट देवदत्त कामत यांनी याचिकेवर तीव्र आक्षेप घेत युक्तिवाद केला. या प्रकरणी न्या. देशमुख यांच्यासमोर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आता जाहीर करण्यात आलाय.
शिवसेनेचे अनिल देसाई विजयी : अनिल देसाई यांना 3 लाख 95 हजार 138 मते मिळाली आणि ते विजयी झाले, तर अर्जदार भिंगारदिवे यांना अवघी 1 हजार 444 मते मिळाली होती, याकडेदेखील न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव करत अनिल देसाई विजयी झाले होते. उच्च न्यायालयाने ही निवडणूक याचिका फेटाळल्याने अनिल देसाई यांना दिलासा मिळालाय.
खासदार अनिल देसाईंना मोठा दिलासा; खासदार म्हणून निवडीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली - MP ANIL DESAI
अनिल देसाई आणि इतर 14 उमेदवारांच्या विरोधात ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती याचिका न्यायमूर्तींनी फेटाळून लावली.
मुंबई उच्च न्यायालय (ETV Bharat File Photo)
Published : Oct 16, 2024, 1:39 PM IST