मुंबई- 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक तहव्वूर राणा ( Tahawwur Rana) याला भारतात लवकरच आणलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि मुंबई गुन्हे शाखेतील विश्वसनीय राणाला लवकरच अमेरिकेतून भारतात आणले जाणार असल्याच्या माहितीला पुष्टी दिली. अमेरिकेच्या फेडरल अपील न्याायलयानं राणाचे अपील फेटाळल्यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
मुंबई हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले, "तहव्वूरचे अपील फेटाळणं हे भारत सरकारचे राजनैतिक यश आहे. त्याचे कायद्यापासून सुटका करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले". पुढे उज्जवल निकम म्हणाले, " राणावर वेगळे आरोप दाखल केले जातील. त्याच्यावर स्वतंत्र खटले चालवले जातील, असे भारत सरकारनं सांगितले. ही बाजू अमेरिकन सरकारनं मान्य करत अमेरिकेच्या न्यायालयाला ही माहिती कळविली. त्यानंतर न्यायालयानं तहव्वूर राणाची याचिका फेटाळली. मला वाटते की लवकरच तहव्वूर राणाला आपल्या देशाच्या ताब्यात दिले जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली जाणार आहे".
कोण आहे तहव्वूर राणा?2008 मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात 175 लोकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा आरोप आहे. भारत आणि अमेरिकेत 1997 च्या प्रत्यार्पण करारानुसार राणाचे प्रत्यार्पण होणार आहे. राणा हा पाकिस्तानी सैन्यदलाचा माजी डॉक्टर असून त्यानं कॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर इमिग्रेशन सेवा सुरू केली. अमेरिकेनं यापूर्वी 26/11 मधील आरोपी डेव्हिड हेडली आणि दाऊद गिलानी यांच्या प्रत्यार्पणाला नकार दिला होता. त्यामुळे राणाचे प्रत्यार्पण भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक अशणार आहेत.
न्यायालयानं राणाचे अपील फेटाळताना काय म्हटलं?
- भारताने पुरेसे सक्षम पुरावे दिल्याचं न्यायालयानं राणाचं प्रत्यार्पणाविरोधातील अपील फेटाळताना म्हटलं आहे.
- मुंबई हल्ल्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु इतर दोन प्रकरणात त्याला दोषी ठरवून 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अपील कोर्टाने निकालात म्हटले, मुंबई हल्ल्याच्या आरोपातून त्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणावर परिणाम झाला नाही. कारण भारतात त्याच्यावर विविध आरोप आहेत.
- आरोपांमध्ये कट रचणे, भारताविरोधात युद्ध पुकारणे, खून, दहशतवाद आणि फसवणूक यांचा समावेश आहे, असे निकालात नमूद करण्यात आलं आहे.
- हेडलीनं अमेरिकन सरकारच्या ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीसाठी माहिती देणारा म्हणून काम केले होते. राणाने हेडलीला त्याच्या व्यवसायाची शाखा सुरू करण्याच्या बहाण्यानं भारताचा पाच वर्षांचा व्हिसा मिळवून दिला होता.
- हेडलीनं व्हिसाचा वापर करून ताज हॉटेल आणि इतर ठिकाणी पाळत ठेवून दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. हेडलीनं राणाला पाळत ठेवण्याच्या हालचालींची माहिती दिली होती, असे निकालात म्हटलं आहे.
- राणानं मुंबईत हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचे कौतुक केलं होतं. तसेच भारतातील लोक त्यासाठी लायक असल्याचं म्हटलं होते, याचा न्यायालयानं निकालात उल्लेख केला.
हेही वाचा-