मालेगाव :Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज बुधवार (दि. 13 मार्च)रोजी सकाळी धुळे शहरात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर राहुल गांधी हे मालेगाव शहरात दाखल झाले. मालेगावमध्ये त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. रोड शो नंतर त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यामधून राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
'आम्ही गरिबांचं कर्ज माफ करणार' : सर्वांना रमजान मुबारक, कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा आता मालेगावपर्यंत आली आहे. आरएसएस आणि भाजपावाले लोक धर्माधर्मात आणि आपापसात भांडणं लावत आहेत. मात्र, हे टीव्हीवर दिसत नाही. मोदी टीव्हीवर दिसतात, पाण्यात दिसतात, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे. तसंच, आरएसएस भावा-भावात आणि राज्या-राज्यात भांडणं लावत आहेत. म्हणून नफरतच्या बाजारात मोहब्बतचं दुकान खोललं आहे. गरीब महिलांसाठी आम्ही बँक खात्यात 1 लाख रुपये वर्षाला देणार आहोत. नरेंद्र मोदी जर करोडपतींचे कर्ज माफ करणार असतील तर आम्ही गरिबांचं कर्ज माफ करणार आहोत, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडून महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा : मोदींनी मोठ्या धूमधडाक्यात महिला आरक्षण दिलं. फटाके फोडले, नाचले आणि सांगितलं की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देण्यात येणार आहे. मात्र, ते दिलं नाही. काँग्रेसचं सरकार आल्यावर लगेच आरक्षण देण्यात येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तसंच, यावेळी देशात 22 असे लोक आहेत, ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच 70 कोटी लोकांकडे आहे. 24 वर्षासाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागतं. तितकीच कर्ज माफी मोदी सरकारने 16 लाख करोड रुपये 22 उद्योगपतींना दिलं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली आहे.