नाशिक Best Summer Season Fruits : राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. उन्हाळ्यात पाण्याची आणि इतर मिनरलची कमतरता शरीरात भासते. यासाठी पटकन परिणाम करणारे अन्न म्हणजे फळं. यातून शरीराला आवश्यक पाणी आणि मिनरल मिळते. अशात फळ बाजारात देखील फळांची आवक वाढली आहे. रसदार फळांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. यात द्राक्ष, कलिंगड, स्ट्रॉबेरी, आंबा, अननस यासारख्या रसदार फळांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. ही फळे रोजच्या आहारात वापरल्यास त्याचा शरीराला फायदा होतो, असं आहार तज्ञ सांगतात.
रसदार फळं फायदेशीर : उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो. त्यामुळं शरीरातून मिनरल्स घामावाटे शरीराबाहेर पडतात. अशा वातावरणात आपल्या शरीरात मिनरल्स, विटामिन्स, इलेक्ट्रॉलाइट्स आहाराद्वारे आपल्या शरीराला मिळाले तर त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे फळं, ज्यात खरबूज, कलिंगड, द्राक्ष, अननस, आंबा, स्ट्रॉबेरी, काकडी यांचा दैनंदिन आहारात वापर करणं गरजेचं आहे. यात कलिंगड आणि खरबूज यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. कॅलरीजचं प्रमाण देखील कमी असल्यानं वजन देखील वाढत नाही. यातून सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम शरीराला मिळतात. तसेच दिवसातून दहा ग्लास पाणी पिलं पाहिजं. यासोबत नारळ पाणी, ताक, उसाचा रस याचा देखील सेवन केल्यास शरीराला फायदेशीर असल्याचा आहार तज्ञ मीनल शिंपी सांगतात.