महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली नसती, पत्नी पीडित संघटनेच्या अध्यक्षांचा दावा - ATUL SUBHASH SUICIDE

बंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणावरुन 'पत्नी पीडित पुरुष' संघटनेनं सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

Bengaluru AI engineer Atul Subhash Suicide Case, Patni Pidit Purush Sanghatana demands law for men
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2024, 7:42 AM IST

Updated : Dec 12, 2024, 1:12 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : उत्तर प्रदेशातील अतुल सुभाष (Atul Subhash Suicide Case) या अभियंत्यानं सोमवारी बंगळुरूच्या मंजुनाथ लेआऊट इथल्या घरी आत्महत्या केल्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. आत्महत्येपूर्वी अतुल सुभाष यांनी 24 पानांची सुसाईड नोट लिहत पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांसह न्यायाधीशांवरही आरोप केले. दरम्यान, या प्रकरणावरुन छत्रपती संभाजीनगरमधील 'पत्नी पीडित पुरुष संघटना' आक्रमक झाली आहे.

भारत फुलारे काय म्हणाले? : या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे म्हणाले की, "महिलांप्रमाणे पुरुषांसाठीदेखील संरक्षण कायदा अस्तित्वात असता तर बंगळुरूतील युवकानं आत्महत्या केली नसती. पत्नीच्या छळाला कंटाळून अतुल सुभाष या युवकानं टोकाचं पाऊल उचललं. ही काय पहिली घटना नाही, तर अशा अनेक घटना समोर येत आहेत. पत्नी पीडित पुरुषांसाठी अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. मात्र, त्या पूर्ण होत नसल्यानं निराश होत असलेले पुरुष टोकाचं पाऊल उचलत आहेत."

पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

महिलांसाठी कायदे : "महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी देशात अनेक कायदे आणण्यात आले. मात्र, आज त्याच कायद्याचा आधार घेत पती किंवा त्याच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलं जातंय. त्यांच्यावर दबाव टाकून काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत. पण त्याविरोधात दाद मागणाऱ्या पतीलाच आरोपी समजलं जातं. न्यायालयात आणि समाजात त्यांच्यावर गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवला जातो. त्यातून हताश झालेले पुरुष आत्महत्या करतात", असंही भारत फुलारे यांनी सांगितलं.

पुरुष आयोगाची गरज : पुढं ते म्हणाले की, "आजच्या आधुनिक युगात केवळ पत्नीच नाही, तर पुरुषही पीडित आहेत. ही बाब लक्षात घेऊन पत्नी पीडित पुरुष आश्रमाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून समाजात पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पाठपुरावा करण्यात आला. मागील आठ वर्षात हजारहून अधिक पुरुषांनी आपली व्यथा संघटनेच्या माध्यमातून मांडली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची गरज आहे. स्त्री पुरुष समानता म्हणलं जातं, तर न्याय देताना देखील ती समानता असली पाहिजे", असं मत फुलारे यांनी व्यक्त केलं.

आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.

हेही वाचा -

  1. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण: पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या, पत्नी, सासूवर गुन्हा
Last Updated : Dec 12, 2024, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details