बीड Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा समाज बांधवांनी आज (21 सप्टेंबर) 'बीड बंद'ची हाक दिली आहे. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जरांगे पाटलांना सहाव्यांदा उपोषण करावं लागतंय. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरी देखील सरकार उपोषणाची दखल घेत नाही. उलट आमचा आवाज दाबण्यासाठी पोलीस प्रशासनानं जवळपास 500 मराठा बांधवांना नोटीस दिल्या आहेत. त्यामुळं आमचं एकच सांगणं आहे. आज हा बंद शांततेत आहे जर सरकारनं याची दखल घेतली नाही तर तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटतील. महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मराठा बांधवांनी दिलाय.
बीड पोलीस ॲक्शन मोडवर: दुसरीकडं बंदच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय. पाचपेक्षा अधिक व्यक्ती जर बेकायदेशीरपणे एका ठिकाणी आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी उद्घोषणा बीड पोलिसांच्या वतीनं शहरात करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ यांनी दिली. तर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात चौकाचौकात तगडा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. तसंच जर कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई करू, असा इशाराही बीड पोलिसांनी दिलाय.