बीड Beed Crime News : बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली. या झाडाझडतीदरम्यान पोलीस निरीक्षक खाडेच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबतच 970 ग्रॅम सोनं आणि पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? :बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आला. यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती तीस लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार 5 लाखांचा पहिला हप्ता घेताना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली. तर हरिभाऊ खाडे आणि जाधव हे दोघंही सध्या फरार आहेत.