अमरावती Bear Attack In Amravati :चरण्यासाठी सोडलेली गाय जंगलातून परतली नसल्यामुळं हरवलेल्या गाईच्या शोधात गुराखी जंगलात गेला. यावेळी त्याच्यावर अस्वलानं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी आधी धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यानंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरजलाल दादू धांडे (48) असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. ते मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या बोराखडी येथील रहिवासी आहेत.
नेमकं प्रकरण काय ? :सुरजलाल धांडे यांची गाय जंगलात चरण्यासाठी गेली. मात्र गाय परतली नाही. यामुळं सुरजलाल हे रविवारी पहाटेच गाय शोधण्यासाठी जंगलात गेले. तेव्हा त्यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. त्यामुळं सुरजलाल रक्तबंबाळ झाले. अशा परिस्थितीतही त्यांनी अस्वलाचा प्रतिकार केला. त्यामुळं अस्वलानं तेथून पळ काढला. दरम्यान गावातील काही युवक जंगलात गेले असता सुरजलाल त्यांना जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी सुरजलाल यांना तातडीनं धावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलं. बीजूधावडी येथे प्राथमिक उपचार केल्यावर अर्धा तासानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. या ठिकाणी डॉ. बालाजी डुकरे, डॉ. समीर खान यांनी उपचार केल्यावर त्याला ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्ता पवार आणि वनपाल खडके यांनी आर्थिक मदत केली. त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं.