पुणे Sunetra Pawar Emotional :बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बारामतीकरांनी आत्तापर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर शरद पवारांनी प्रत्यूत्तर देत टीका केली होती. बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागं उभं राहावं, त्यात गैर काय? मात्र यात दोन गोष्टी आहेत, एक मूळ पवार आणि दुसरी बाहेरून आलेले पवार, असा टोला त्यांनी नाव न घेता सुनेत्रा पवारांना लगावला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर : शरद पवारांनी केलेल्या टीकेबद्दल सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांना अश्रू अनावर झाले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच त्या डोळ्यांना रुमाल लावत तिथून निघून गेल्या. या प्रश्नामुळं सुनेत्रा पवार यांचा हुंदका दाटून आल्याचं दिसून आलं. त्यामुळं त्यांनी उत्तर देण्याचं टाळत निघून जाणं पसंत केलं.