पुणे Supriya Sule Exclusive IV : फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही पवारांकडून तसंच दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. तसंच भाजपाकडून '400 पार'चा नारा दिला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, ''भाजपाला देशाचं संविधान बदलायचंय. संविधान बदलण्यासाठी '400 पार' असं त्यांचे खासदार म्हणत आहेत, हे खूपच दुर्दैवी आहे. पण आम्ही त्यांना संविधान बदलू देणार नाही. पुण्यातील वारजे इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुळे यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
महागाई आणि बेरोजगारीला जनता त्रस्त : यावेळी सुप्रिया सुळे यांना प्रचारात नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, "किती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ते सर्वांसमोर आहे. आज नागरिकांमध्ये महागाई, बेरोजगारीबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. महागाईमुळं लोक त्रस्त झाले आहेत. वाढता भ्रष्टाचारदेखील चिंतेचा विषय आहे. तसंच आज देशात महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गोष्टींचं आव्हान आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय. या समस्यांच्या निवारणासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत."