पुणे -संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केलं. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार हे राजकारण चांगलंच तापलं आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच बारामती तालुक्यातील मेडद गावात असलेल्या शरयू मोटर्सवर पोलिसांनी सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन केलं आहे. या कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आहेत. त्यांचा मुलगा युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्यानं बारामतीच राजकारण चांगलंच तापलं आहे.
निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या नेमण्यात आलेल्या एका विशिष्ट पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येतात. त्याच पद्धतीने शरयू टोयाटो कंपनीवरदेखील तपास करण्यासाठी पथक गेले होते. त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आलेले नाही-बारामतीचे विभागाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, वैभव नावडकर
- निवडणूक आयोगाच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्यात आल्याच्या माहितीला श्रीनिवास पवार यांनी दुजोरा दिला. ते वृत्तसंसस्थेशी बोलताना म्हणाले, " निवडणूक आयोगाच्या पथकानं आम्हाला व्हिडिओ काढण्यास मनाई केली. अर्धा तास ऑपरेशन करून पोलीस निघून गेले. वाहनांची डिक्की खोलूनही तपासणी करण्यात आली."